मैत्री आणि लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय हिंदु तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणे, तिला घरात डांबून मारहाण करणे तसेच तिचे धर्मांतर करून नाव बदलण्यासाठी धमकावल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपारा येथे उघडकीस आला आहे. पुढील दोन वर्षांत सर्व हिंदू मुलींचे धर्मांतर होणार आहे, अशी धमकी देत आरिफ आयुब शेख याने पीडितेचा लैंगिक छळ केला. या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी आरिफ आयुब शेख, त्याची आई रुक्साना खान आणि मावस भाऊ साहिल खान या तिघांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीतील माहितीनुसार, अंधेरी येथे अकाऊंटंट म्हणून काम करणाऱ्या पीडित तरुणीची ओळख एका पार्टीदरम्यान आरिफ आयुब शेख (वय २२) याच्याशी झाली होती. पीडितेचे तिच्या मैत्रिणीकडे अडकलेले पैसे मिळवून देण्याचे आश्वासन देऊन आरिफने तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने तिच्याकडून १० हजार रुपये उकळले तसेच त्याची आई रुक्साना ही ज्योतिषी असल्याचे सांगून तरुणीला घरी नेले. आरोपीच्या आईने पीडितेला भिती दाखवून आणि तिची दिशाभूल करून घर सोडण्यास प्रवृत्त केले.
एप्रिल २०२५ मध्ये आरोपीने तरुणीला स्वतःच्या घरी आणून “आपले लवकरच लग्न होणार आहे” असे सांगत तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वारंवार अत्याचार केले. त्यानंतर हिंदू वस्तीमध्ये राहण्यासाठी स्वतःची खोटी ओळख दाखवून एका भाड्याच्या खोलीत तिला लिव्ह-इनमध्ये ठेवले. त्या ठिकाणीही तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आले व विरोध केला असता आरोपी आणि त्याचा मावस भाऊ साहिल यांनी तिला बेदम मारहाण केली. तसेच इतर मुलींचेही आक्षेपार्ह फोटो त्याच्या मोबाईलमध्ये असल्याचे उघड झाल्यावर आरोपीने तरुणीला धमकावून घरातून बाहेर पडण्यास बंदी घातली.
हे ही वाचा:
पंजाबमध्ये ड्रग्सविरोधात लोकांचा संताप…. मारेकऱ्याचे दुकान जाळले, घरावर बुलडोझर
टाटा ट्रस्ट्समधील वाद न्यायालयात
आशुतोष रांका, सौरव दासला पाच दिवसांसाठी पाठवले तिहार तुरुंगात
साखरेची मागणी वाढली, दरातही वाढ
तुला बुरखा घालावा लागेल…
नवरात्रीदरम्यान तरुणीने आपल्या मित्राला ही हकीकत सांगण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी तिचा मोबाईल फोडून तिला बेदम मारहाण केली. त्यावेळी आरोपीच्या आईने “तुला आता बुरखा घालावा लागेल” असे फर्मावले, तर आरिफने “लग्नानंतर तुझे नाव ‘सोनाली’वरून ‘सानिया शेख’ करणार; दोन वर्षांत सर्व हिंदू मुलींचे धर्मांतर होणार आहे, त्यामुळे हे मान्य कर नाहीतर परिणाम वाईट होतील” अशी थेट धमकी दिली. या छळातून कशीबशी सुटका करून घेत पीडितेने आपल्या पालकांना सांगितली आणि नालासोपारा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ६४(२)(m) (वारंवार बलात्कार), १२७(२) (बेकायदेशीर डांबून ठेवणे), ११५(२) (दुखापत करणे), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान), ३५१(२) (धमकावणे) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
