घरसंपादकीयअखेर ठाकरे गॅंग रडारवर; ‘दिशा’भूल करणारे राणेही अडचणीत...

अखेर ठाकरे गॅंग रडारवर; ‘दिशा’भूल करणारे राणेही अडचणीत…

दिशा सालियन सामुहीक बलात्कार आणि हत्या प्रकरणी अखेर सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. बॉलिवूड माफीया, राजकीय माफीया, पोलिस, पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर, फॉरेन्सिक लॅबचे तज्ज्ञ अशा अनेकांची नावे या एफआयआरमध्ये आहेत. जे प्रत्यक्षदर्शींनी पाहीले, पोलिसांनी नोंदवले, कागदपत्रातून समोर आले, त्यात प्रचंड विसंगती आहेत. कारण खोटे बोलण्यासाठी, सांगण्यासाठी पुरेशा तयारीला वेळ मिळाला नव्हता. खोटे बोलणाऱ्यांना बोलते केले तर दिशा प्रकरणात सीबीआयकडून न्यायाची अपेक्षा केली जाऊ शकते.

दिशावर झालेला सामुहीक बलात्कार, हत्या, पुरावे नष्ट करणे, अधिकाऱ्यांनी तपासात केलेली दिशाभूल, निर्माण केलेले चुकीचे रेकॉर्ड याप्रकरणी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारावर सीबीआयने हा एफआयआर दाखल केलेला आहे. हत्या आणि बलात्कार हा मामूली गुन्हा ठरेल एवढे मोठे षडयंत्र हे गुन्हे दडपण्यासाठी करण्यात आलेले आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणा त्यासाठी कामाला लावण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी दाद मागितल्यानंतर याप्रकरणी सीबीआय तपासाचे आदेश उच्च न्यायालयाने एफआयआरचे आदेश दिले. जोपर्यंत तपास यंत्रणांच्या हाती ठोस पुरावे हाती येत नाहीत, तोपर्यंत कोणाचा आरोपी म्हणून उल्लेख नको, असेही न्यायालयाने बजावले आहे.

मालडच्या रिजण्ट गॅलेक्सीच्या फ्लॅट क्र १२०२ मध्ये दिशाचा होऊ घातलेला नवरा रोहन रॉय आणि हिमांशू शिखरे, इंद्रनील वैद्य आदी मित्र उपस्थित होते. तिथे आदित्य ठाकरे, सुरज पांचोली, दिनो मोरया, आले त्यांनी दिशावर सामुहीक बलात्कार करून तिची हत्या केली. दिशाला आदित्य ठाकरे आणि त्याच्या टोळक्याबाबत बरेच काही ठाऊक होते, ते तिने सुशांतला सांगितले होते. म्हणून दोघांनाही संपवण्यात आले, असा सतीश सालियन यांचा दावा आहे. सालियन यांच्या तक्रारीत यांची आरोपी म्हणून नावे आहेत. आता सीबीआयच्या तपासानंतर यापैकी किती जणांची नावे आरोपपत्रात येतात हे पाहावे लागेल.

सतीश सालियन यांच्या तक्रारीवरून सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. हा तपास सोपा नाही. परंतु आधी ज्यांनी तपास केला, त्यात असलेल्या विसंगतीवर बोट ठेवले तर तपास करणारे अधिकारी, साक्ष देणारे प्रत्यक्षदर्शी आणि पुरावे देणारे फोरेन्सिक लॅबचे तज्ज्ञ, पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर, कर्मचारी सगळेच अडचणीत येणार आहे. त्यांच्या अडचणी वाढल्या तर कदाचित सत्य त्यांच्या तोंडातून बाहेर येईल याची शक्यता आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिशाभूल करणारी माहिती दिली असेल तर त्याचे कारण उघड आहे. आरोप आदित्य ठाकरे यांच्यावर होते. ते महाविकास आघाडी सरकारमधअये मंत्री होते. प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या विरोधात कोण साक्ष देणार?

हे ही वाचा:

स्वतंत्र भारद्वाजला तीन आठवड्यांची अंतरिम जामीन मंजूर

अमित शहांचे भाषण ऐकले असते तर विरोधकांची थोबाडे काळी झाली असती!

सेन्सेक्स ७७८ अंकांनी कोसळला

ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई ४.८२ टक्क्यांवर

गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या राणे कुटुंबियांनी याप्रकरणी साक्ष दिली आहे. प्रीती राणे आणि त्यांचा मुलगा प्रियेश राणे यांची साक्ष आहे. हे कुटुंब फ्लॅट क्रमांक ११०१ मध्ये राहणारे. दिशा ७ जून २०२० रोजी सायंकाळी ७.३० नंतर फ्लॅटमधून बाहेर पडलीत नाही, असे रोहन रॉयने पोलिस जवाबात सांगितले आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिशा ८.३० वाजता या फ्लॅटमध्ये गेल्याची नोंद सीसीटीव्ही फूटेज मध्ये असल्याचे एड. नीलेश ओझा यांचे म्हणणे आहे. आणखी एका फूटेजमध्ये पहाटे १२.५५ रोजी प्रीती राणे, सेक्युरीटी गार्ड मुन्ना आणि रोहन रॉय हे लिफ्टने १२ व्या मजल्यावर जात असल्याचे दिसते, असेही ते म्हणाले.

एवढ्या अपरात्री हे तिघे लिफ्टमध्ये एकत्र का होते. प्रीती राणे आणि त्यांचा मुलगा प्रियेश यांच्या जवाबानुसार पहाटे १.३० च्या सुमारास त्यांना काही तरी पडल्याचा आवाज आला. त्यानंतर त्यांनी सेक्युरीटी गार्डला फोन केला. त्यांच्या म्हणण्यानुसार दिशा याच वेळी खाली पडली होती. त्याच्या ठिक २५ मिनिटे आधी हे तिघे इमारतीच्या लिफ्टमध्ये काय करत होते. प्रीती राणे यांनी याबाबत पोलिसांना माहिती का दिली नाही?

पोलिस उपनिरीक्षक राहुल देवडे वाकोल्यातील फोरॅन्सिक लॅबला पाठवलेल्या पत्रात दिशावर सामुहीक बलात्कार झाला होता का, याची विचारणा केली होती. याचा अर्थ स्पष्ट आहे. पोलिसांना बलात्काराचा संशय होता. तरीही २०२० मध्ये याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला नाही. अपघाती मृत्यूची नोंद करून पोलिस हातावर हात ठेवून का बसले. कारण पोलिस कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांवर प्रचंड दबाव होता.

सीबीआय चौकशीत या सगळ्या  भानगडी उघड होऊ शकतात. सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे, दिनो मोरया, सुरज पांचोली, यांच्यावर ठपका ठेवला आहे. हे प्रकरण दडपणाऱ्यांचीही नावे आहेत. सह तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पोलिस आय़ुक्त परमबीर सिंह, मालवणी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव, डीपीसी विशाल ठाकूर आणि अन्य तपास अधिकाऱ्यांची नावे आहेत. एका दुर्दैवी तरुणीवर झालेला बलात्कार रोखण्यासाठी राज्याची संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लावण्यात आली होती, त्याचा उलगडा व्हायला सुरूवात झाली आहे.

एखाद्या भानगडीवर पडदा टाकण्याचा प्रय़त्न केला जात असताना, प्रत्येकाने काय खोटे बोलायचे हे ठरलेले नसते. हीच ती बाब आहे, ज्यामुळे दिशा सालियनच्या तपासातून काही निष्पन्न होईल अशी आजही आशा आहे. जेव्हा दिशा खाली पडली किंवा तिला फेकण्यात आले किंवा तिची हत्या करून तिचा मृतदेह खाली आणून ठेवण्यात आला, हे ज्यांना ठाऊक होते, ज्यांनी हे पाहीले होते, त्यांनी तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल केली. चुकीची माहिती दिली. एक तर दबाव किंवा आमिष ही त्याची कारणे असू शकतील. तपासातील सगळ्यात महत्वाची बाब ठरत आहे.

जुलै २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतरही दुर्दैवाने दिशा आणि सुशांतच्या प्रकरणात तपासाला गती आली नाही. महायुती सरकारने एसआयटीची घोषणा केली. या एसआयटीने काय तपास केला हे कोणालाही ठाऊक नाही.

एसआयटीच्या घोषणेनंतर आदित्य ठाकरे आणि त्याचे मित्रमंडळ यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले नाही. हे फार मोठे नेते आहे, असे वाटल्यामुळे झाले असेल बहुतेक. पोलिसांना त्यांना मोठेपणा द्यायचा असेल तर त्यांनी मातोश्रीवर जाऊन चौकशी करायला हरकत नव्हती. परंतु काहीही झाले नाही. आता सीबीआयकडे तपास आलेला आहे. सीबीआयकडे ताकद आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांना तपास करताही येतो. आता तरी आदित्य ठाकरे आणि त्याच्यासोबत जे दिशाच्या फ्लॅटमध्ये होते, असा आरोप होतो आहे, त्यांची चौकशी केली जाणार आहे काय?

कानून के हात लंबे होते है… हा डायलॉग फिल्मी नाही, हे दाखवण्याचे काम आता सीबीआयला करावे लागणार आहे. आदित्य ठाकरे आणि त्यांच्या बॉडीगार्डचे नाव एफआयआरमध्ये आहे. आदित्य ठाकरे याप्रकरणात एकदा तोंड उघडून फसले आहेत, त्यामुळे ते दिशा प्रकरणात एक शब्दही बोलायला तयार नाहीत. दिशाचा मृत्यू झाला तेव्हा मी तिथे नव्हतो. आजोबांचा मृत्यू झाल्यामुळे मी तिथे गेलो होतो, हे आदित्य ठाकरे यांचे विधान होते. त्यांचे आजोबा माधव पाटणकर यांचा मृत्यू १५ जून २०२० मध्ये झाला. दिशा आणि त्यांच्या मृत्यूमध्ये आठ दिवसांचे अंतर आहे.

दिशा आणि सुशांत प्रकरणी न्याय होणार आहे काय? हा खूप नंतरचा प्रश्न आहे. काही प्रश्नांची जनतेला तातडीने उत्तरे हवी आहेत. याप्रकरणी गेली अनेक वर्षे आवाज उठवणारे, हा विषय घेऊन दोन हात करणारे एड. नीलेश ओझा यांच्या जीवीताची काळजी सरकार वाहणार आहे का?  यात ज्या बड्या धेंडांची नावे एफआयआरमध्ये घेण्यात आली आहेत, त्यांची चौकशी होणार आहे का? प्रत्यक्षदर्शींना पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे का? सीबीआय़च्या माध्यमातून याप्रकरणाचा गंभीरपणे तपास होणार आहे का? अनेक प्रश्नांना उत्तरांची प्रतीक्षा आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version