घरसंपादकीयमाफी मागून मोकळे झाले होते, डोवालांविरुध्द खोटे विकणारे...

माफी मागून मोकळे झाले होते, डोवालांविरुध्द खोटे विकणारे…

- Advertisement -

कोणी तरी काही तरी छापायचे आणि त्याचा आधार घेत काँग्रेस नेत्यांनी, त्यांच्या पिलावळीने आरोप करायचे, आरोप बुडाशी येताना दिसले की माफी मागून मोकळे व्हायचे. हे सतत घडताना दिसते आहे. हा यशस्वी पॅटर्न आहे. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या दोन मुलांचे काळ्या पैशाशी कथित कनेक्शन उघड करणारा ‘द डी कंपनीज’ हा खळबळजनक लेख ‘द कारवां’ या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झाला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी त्या लेखाच्या आधारे पत्रकार परिषद घेऊन आरोपांची राळ उडवली. बदनामीचा खटला दाखल झाल्यानंतर माफी मागून मोकळे झाले. आरोपांएवढी माफीची चर्चा होत नाही, त्यामुळे आरोपच लोकांच्या स्मरणात राहतात. राज ठाकरे यांच्यासारखे नेते हेच आरोप उचलतात आणि सभेत खूप मोठा गौप्यस्फोट केल्याचा आव आणतात. नेत्यांच्या थापांचे ते व्हिडिओ समर्थक उचलतात आणि फिरवत बसतात. सध्या ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या बातमीमुळे या पॅटर्नची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

आरोप करायचे, खळबळ उडवायची आणि आरोप खोटे आहेत हे सिद्ध झाल्यानंतर हळूच माफी मागायची आणि मोकळे व्हायचे, ही काँग्रेसच्या नेत्यांची परंपरा आहे. याचे कारण स्पष्ट आहे. आरोपांचे मथळे होतात. माफी आतल्या पानात दोन कॉलम बातमीमध्ये किंवा चौकटीत प्रसिद्ध होते. सध्या ‘इंडियन एक्सप्रेस’च्या बातमीने खळबळ उडाली आहे. बातमीत दम नाही हे सिद्ध होईपर्यंत पत्रकार परिषदा होतील, मोर्चे निघतील. आंदोलनाची घोषणा होईल. चॅनलवाल्यांचीही रतीब टाकण्याची सोय होईल. जनतेची जमेल तेवढी दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. बातमीत दम नव्हता हे उघड होईपर्यंत पुढची खळबळजनक बातमी येईल.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी काँग्रेसला सेवा पुरवली होती. त्यावेळेस त्यांचे ‘लाव रे तो व्हिडिओ’ प्रकरण गाजले होते. यातील बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर मध्येमध्ये फिरत असतात. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या विरोधातील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर कोणी तरी अपलोड केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित डोवाल यांच्याविरोधात जी बडबड केली होती, त्यानंतर ‘एक्स’वर राज ठाकरे यांचा तो व्हिडिओ पुन्हा व्हायरल झालेला आहे. हे तर आमच्या साहेबांनी आधीच सांगितले होते, असा आव तो व्हिडिओ अपलोड करणाऱ्याने आणलेला आहे.

राजकीय नेत्यांनी मारलेल्या थापा सोशल मीडियावर कशा अमर होतात, त्याचे हे उदाहरण. राज ठाकरे यांचा हा व्हिडिओ तेव्हाही काँग्रेसच्या पिलावळीने व्हायरल केला होता. ‘द कारवां’ या पोर्टलवर आलेला लेख हा राज ठाकरे यांच्या व्हिडिओचा आधार होता. अजित डोवाल यांच्या मुलाच्या केमन बेटांवरील कंपनीत काळ्या पैशांची तथाकथित भानगड हा या लेखाचा विषय होता. १६ जानेवारी २०१९ ला हा लेख ‘द डी कंपनीज’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला. अजित डोवाल यांचा मुलगा विवेक हा केमन बेटांवर ‘जीएनवाय एशिया फंड’ नावाची कंपनी चालवतो. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीनंतर ही कंपनी अवघ्या १३ दिवसांत सुरू करण्यात आली. या कंपनीचा संबंध हवाला, काळ्या पैशाशी असल्याचे बेछूट आरोप करण्यात आले.

याच लेखाच्या आधारे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक पत्रकार परिषद घेतली, शौर्य आणि विवेक डोवाल यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अजित डोवाल आणि मोदी सरकारवर निशाना साधला. १९ डिसेंबर २०२० रोजी विवेक डोवाल यांनी ‘द कारवां’, पत्रकार कौशल श्रॉफ आणि जयराम रमेश यांच्याविरुद्ध मानहानीचा फौजदारी खटला दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात दाखल केला. जयराम रमेश लटपटले. निवडणुका जवळ आल्या असल्यामुळे लेखात उपस्थित करण्यात आलेले सवाल उपयुक्त वाटले, असल्यामुळे मी त्या आधारे आरोप केले. माझ्या आरोपांमुळे डोवाल कुटुंबीयांची बदनामी झाली असेल तर मी माफी मागतो, असे सांगून मोकळे झाले. जयराम रमेश आणि राज ठाकरे दोघांनी अजित डोवाल यांच्याविरोधात जे आरोप केले, त्याला आधार ‘द कारवां’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाचा होता. जयराम रमेश यांनी माफी मागितली. राज ठाकरे यांचे आरोप त्यांचे समर्थक आजही मोठा गौप्यस्फोट मानून डोक्यावर घेताना दिसतायत. डोवालांच्या दृष्टीने राज ठाकरे अदखलपात्र असल्यामुळे त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करण्यात आला नसावा.

हे ही वाचा:

१ ऑक्टोबरपासून एफडीचे नियम बदलणार

आयआयटी मुंबईत एससी, एसटी, ओबीसी प्राध्यापकांची कमतरता

देशातली पहिली ड्युअल-फ्युअल रेल्वे धावली!

श्रीशंकर, पट्टुराज लॉन्ग जंपच्या अंतिम फेरीत

२०१९ च्या निवडणुकीत राज ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने मैदानात उतरले होते. प्रचाराची सुपारी त्यांना देण्यात आली होती. या निवडणुकीत त्यांचे ‘लाव रे तो व्हिडिओ’ प्रकरण गाजले होते. समर्थकांच्या टाळ्या मिळण्याच्या प्रयत्नात त्यांनी तेच आरोप केले, जे जयराम रमेश यांनी केले होते. आरोप करताना त्यांनी ‘द कारवां’चा उल्लेख केला होता. एक पाकिस्तानी इसम डोवाल यांच्या मुलाचा पार्टनर असल्याचेही सांगून टाकले. एक पार्टनर अरब असल्याचेही सांगितले. गमतीची बाब अशी की, ‘द कारवां’च्या प्रदीर्घ लेखात पाकिस्तानी भागीदाराचा उल्लेखच नाही. अर्थ स्पष्ट आहे. ‘द कारवां’मध्ये प्रसिद्ध झालेली लेख राज ठाकरे यांनी वाचलाच नव्हता. ऐकीव माहिती जाहीर सभेत त्यांनी विकली आणि टाळ्या मिळवल्या…

सरकारच्या कारभारातील कमतरता, भ्रष्टाचार याच्यावर टीका करणे हा विरोधकांचा हक्कच आहे. आरोपांचा मारा करताना एखादी थाप पचून जाते, लोक फार मनावर घेत नाहीत. परंतु मोदी सरकारवर टीका करताना विरोधकांनी भारांभर थापा आणि कणभर सत्य असे प्रमाण ठेवले आहे. खोटे बोला, अर्धसत्य बोला, हीच रणनीती आहे. खोटे बोलणाऱ्यांना दणका बसत नाही, हा दुर्दैवाचा भाग.

पुलवामा हल्ल्याच्या संदर्भात अजित डोवाल यांची चौकशी करा, अशी जाहीर मागणी राज ठाकरे यांनी केली होती. पुलवामा हल्ल्याचा संबंध मोदी सरकारशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय फायदा मिळवण्यासाठी मोदींनीच पुलवामाचा हल्ला घडवून आणला होता आणि आपल्याच सैनिकांचे बळी घेतले होते, असा निलाजरा ठपका काँग्रेसचे नेते लावत होते, त्याला हवा देण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी केला होता. अजित डोवाल यांच्यासारख्या देशभक्त, कर्मठ आणि कर्तृत्ववान अधिकाऱ्यावर ठपका ठेवण्याचा, त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला होता.

नंतर पुलवामा हे पाकिस्तानचे षड्यंत्र असल्याचे पाकिस्तानी नेते, तिथले दहशतवादी, अमेरिकी तपास यंत्रणा यांनी ओरडून ओरडून सांगितले. पुलवामाचा हल्ला आम्हीच केला होता, असे पाकिस्तानचा मंत्री फवाद चौधरी याने त्यांच्या नॅशनल असेंबलीमध्ये जाहीर केले होते. अमेरिकेच्या एफबीआयने पुलवामा हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याचे पुरावे दिले. राज ठाकरे गौप्यस्फोटाच्या नावाखाली खोटे बोलत होते, याचे पुरावे पाकिस्तानातूनच समोर आले. कधी काँग्रेससाठी ‘लाव रे तो व्हिडिओ’चे प्रयोग करायचे, कधी काँग्रेसच्या विरोधात करायचे, यावर कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. आक्षेप गौप्यस्फोटाच्या नावावर थापा मारण्याबद्दल आहेत.

सात वर्षांपूर्वीची ही कथा सांगण्याचे कारण एवढेच की, मीडियात करण्यात आलेला प्रत्येक गौप्यस्फोट खरा असेलच याची काही आवश्यकता नाही. राफेल खरेदी प्रकरणात घपला झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्याचा आधारही ‘द हिंदू’ या दैनिकात प्रसिद्ध झालेली अर्धवट बातमी होती. ‘चौकीदार चोर है’ या मोहिमेचा आधार ही बातमी होती. पुढे राहुल गांधी यांनी याप्रकरणी न्यायालयात बिनशर्त माफी मागितली. संजय राऊत हे महाराष्ट्रातील असेच आरोप सम्राट आहेत, त्यांनी किती प्रकरणात आरोप करून माफी मागितली याची गणनाच नाही. गिरणा सहकारी साखर कारखान्यात १७८ कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी महायुती सरकारमधील मंत्री दादा भुसे यांच्यावर केला होता. बदनामीचा खटला भरल्यानंतर माफी मागून ते मोकळे झाले. खोटे बोलणाऱ्यांच्या कपाळी जोपर्यंत सोटा हाणला जात नाही, तोपर्यंत हे सुधारण्याची शक्यता नाही.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version