ग्रीनलँडवरून अमेरिका आणि डेन्मार्कमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. अमेरिका, डेन्मार्क आणि ग्रीनलँड यांच्यात ग्रीनलँडच्या सुरक्षेबाबत करार झाल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. या करारामुळे ग्रीनलँडच्या सुरक्षा व्यवस्थेवर अमेरिकेला कायमस्वरूपी नियंत्रण मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टमध्ये म्हटले की, ग्रीनलँड आणि अमेरिकेच्या सुरक्षेचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती कोणतीही कारवाई करण्याची क्षमता अमेरिकेकडे कायमस्वरूपी असेल. तसेच अमेरिकेच्या स्पष्ट लेखी मंजुरीशिवाय कोणत्याही प्रतिस्पर्धी देशाला ग्रीनलँडमध्ये लष्करी तळ उभारता येणार नाही, लष्करी उपस्थिती ठेवता येणार नाही किंवा संवेदनशील क्षेत्रात गुंतवणूक करता येणार नाही.
ट्रम्प यांनी या कराराचे वर्णन ‘अनंतकालीन करार’ (Infinite Life Agreement) असे केले आहे. या कराराला कोणतीही समाप्तीची मुदत नसल्याचेही त्यांनी म्हटले. ग्रीनलँडचे सामरिक महत्त्व गेल्या १०० वर्षांपासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना माहीत होते, मात्र या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढता आला नाही, असा दावा ट्रम्प यांनी केला. ग्रीनलँडमध्ये मोठ्या प्रमाणावर अमेरिकन लष्करी उपस्थिती विकसित करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली आहे. या विकासकामात ग्रीनलँडच्या जनतेसोबत काम करण्याचे त्यांनी म्हटले आहे.
BREAKING NEWS: I am pleased to announce that the United States of America has entered into an Agreement with The Kingdom of Denmark, and Greenland, that gives the United States permanent control over security, and all other needs, in Greenland, completely addressing ALL of our…
— Donald J. Trump (@realDonaldTrump) September 19, 2026
ग्रीनलँडच्या सामरिक स्थानामुळे आर्क्टिक क्षेत्रातील अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यातील स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या कराराकडे पाहिले जात आहे. अमेरिकेकडे ग्रीनलँडच्या उत्तरेला पिटफिक लष्करी तळ आधीपासूनच आहे. याशिवाय दक्षिण ग्रीनलँडमध्ये आणखी तीन अमेरिकन लष्करी तळ उभारण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा:
परीक्षेत चॅटजीपीटी वापरताना पकडल्यानंतर विद्यार्थ्याची आत्महत्या
निकेत कौशिक यांनी घेतले करूळकरांच्या विघ्नहर्त्याचे दर्शन
तिरुपती लाडू प्रकरणी ‘सुकृती फूड्स’च्या प्रवर्तकाला अटक
रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर १०० टक्के टॅरिफ
डेन्मार्क, ग्रीनलँडकडून सकारात्मक प्रतिक्रिया
डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी या कराराच्या शक्यतेबद्दल समाधान व्यक्त केले असून, तो ग्रीनलँड, डेन्मार्क, अमेरिका तसेच नाटो आणि युरोपसाठी चांगला ठरू शकतो, असे म्हटले आहे. ग्रीनलँडचे पंतप्रधान जेन्स-फ्रेडरिक नील्सन यांनीही या करारामुळे ग्रीनलँडची सुरक्षा अधिक मजबूत होत असल्याचे म्हटले आहे. या करारावर पुढील आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या पार्श्वभूमीवर डेन्मार्क आणि ग्रीनलँडकडून स्वाक्षरी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
