दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून सुरू असलेल्या वादाला आता कायदेशीर वळण मिळाले आहे. दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांना बजावलेल्या ५०० कोटी रुपयांच्या मानहानीच्या नोटिशीला आदित्य ठाकरे यांनी २५ पानी उत्तर दिले आहे. या उत्तरात नोटिशीतील आरोप फेटाळून लावत, माफी मागण्यास तसेच ५०० कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यास स्पष्ट नकार देण्यात आला आहे. ही नोटीस कायदेशीरदृष्ट्या असमर्थनीय असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांच्या वतीने करण्यात आला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या वतीने त्यांचे वकील अंशुमन सिन्हा यांनी हे उत्तर दिले आहे. दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर १६ सप्टेंबर रोजी आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर मराठी आणि इंग्रजी भाषेत पोस्ट केल्या होत्या. या पोस्टनंतर सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरेंना ५०० कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्याची नोटीस बजावली होती. १९ सप्टेंबर रोजी सतीश सालियन आणि त्यांच्या वकिलांनी मातोश्री येथे जाऊन ही नोटीस सुपुर्द केली होती.
आता या नोटिशीला दिलेल्या उत्तरात आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे मांडले आहेत. सोशल मीडियावरील संबंधित मराठी आणि इंग्रजी पोस्टमध्ये सतीश सालियन यांचे नाव कुठेही घेतलेले नाही, त्यामुळे त्या पोस्टमधून त्यांची मानहानी झाल्याचा दावा करता येणार नाही, असा युक्तिवाद करण्यात आला आहे. तसेच दिशा सालियन यांच्या मृत्यूशी आपला संबंध असल्याचे आरोप आणि त्यासंदर्भातील राजकीय तसेच माध्यमांमधील चर्चेला उत्तर देण्यासाठीच या पोस्ट करण्यात आल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
दिशा सालियन यांच्या मृत्यूची घटना जून २०२० मध्ये मालाड येथील एका इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून पडल्याने घडली होती. सुरुवातीच्या पोलिस तपासात घातपाताचा पुरावा आढळला नसल्याचे सांगण्यात आले आणि या प्रकरणाचा आत्महत्या म्हणून निष्कर्ष काढण्यात आला. त्यानंतर प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात आली. एप्रिल २०२६ मध्येही यापूर्वीच्या निष्कर्षानुसार तपास बंद करण्यात आला होता.
