आसाममध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’ अर्थात सीजेपी आणि भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार यांच्यात राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. पक्षाच्या आसममधील पहिल्या प्रादेशिक स्वयंसेवक बैठकीपूर्वी सीजेपीचा सहसंयोजक आशुतोष रांकासह पक्षातील अनेक नेते आणि स्वयंसेवकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.
रांकाला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्यावर निशाणा साधला. सीजेपी आणि आसाममधील जनतेला मुख्यमंत्री घाबरत असल्याचा आरोप त्यांनी केला. खासगी जागेवर शांततेत होणारी स्वयंसेवकांची बैठक रोखण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचा दावा रांका याने केला.
रांकाला ताब्यात घेतल्यानंतर प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हटले, “आम्हाला आसामची परिस्थिती जनतेसमोर आणायची होती. राज्यातील शाळांची स्थिती, काझीरंगा येथील वास्तव आणि आसममधील मानवनिर्मित पुराचा मुद्दा आम्हाला मांडायचा होता. म्हणूनच आम्हाला ताब्यात घेण्यात आले आणि आमच्या सदस्यांना धमकावण्यात आले. मात्र, या भूमीतील जनतेला घाबरवणे इतके सोपे नाही, हे ते विसरले आहेत.”
हे ही वाचा:
बॉक्सिंगमध्ये भारताला पहिले पदक निश्चित!
भारताची अर्थव्यवस्था १० टक्क्यांहून अधिक वेगाने वाढू शकते
पाकिस्तानात भीषण आत्मघाती स्फोट; ११ ठार, ३० जखमी
बेंगळुरूत विनाहेल्मेटबद्दल दंड…नंतर कळले ते होते गिटार!
सीजेपी गुवाहाटीमध्ये आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी पहिली प्रादेशिक स्वयंसेवक बैठक आयोजित करण्याच्या तयारीत होती. आशुतोष रांका शनिवारी आसाममध्ये दाखल झाला. रांकाने ताब्यात घेतले जाण्यापूर्वी काही तास अगोदरच राज्य प्रशासनावर बैठकस्थळी जाणारे मार्ग बंद केल्याचा आरोप केला होता. तसेच पक्षाच्या सदस्यांना धमकावले जात असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
रांकाने ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये दावा केला होता की, बैठकीच्या ठिकाणी जाणारा संपूर्ण रस्ता दोन्ही बाजूंनी बॅरिकेड लावून बंद करण्यात आला आहे. आसाम पोलीस अश्रुधुराचा वापर करण्यासाठी सज्ज असल्याचा आणि सीजेपीच्या स्वयंसेवकांना ताब्यात घेतले जात असल्याचाही त्यांनी आरोप केला. बैठकीच्या ठिकाणी कोणालाही पोहोचू दिले जात नसल्याचे त्यांनी म्हटले होते.
सीजेपी संस्थापकांचा पोलिसांवर आरोप
रांकाला ताब्यात घेण्याच्या घटनेनंतर सीजेपीचा संस्थापक अभिजीत दिपके याने आसाम पोलिसांवर टीका केली. आशुतोष रांका आणि त्याच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अज्ञात ठिकाणी नेल्याचा दावा दिपकेने केला. दिपकेने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, सीजेपीचे नेते आणि स्वयंसेवक आसाममध्ये एका छोट्या स्वयंसेवक बैठकीसाठी जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
सीजेपीने रांका आणि इतर ताब्यात घेतलेल्या स्वयंसेवकांची तातडीने सुटका करण्याची मागणी केली आहे. पोलिसांच्या कारवाईनंतरही असममधील पक्षाची तळागाळातील मोहीम सुरूच राहणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
