पंजाबमधील अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका केली. ‘पंजाबचे सरकार दिल्लीतून चालवले जाते. अर्धे नियंत्रण अमित शाह यांच्याकडे, तर अर्धे अरविंद केजरीवाल यांच्याकडे आहे. भगवंत मान केवळ मुख्यमंत्रीपदावर बसले आहेत,’ असा आरोप त्यांनी संगरूर येथील काँग्रेसच्या ‘इन्साफ रॅली’त केला.
आपने सत्तेत येताना पंजाबला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, राज्यातील कोणत्या भागातून हे संकट संपवले, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी भगवंत मान यांच्या मद्यपानाच्या सवयीवरही टीका केली. लोकसभेत एकत्र असताना सकाळी ११ वाजताच त्यांच्या तोंडातून दारूचा वास येत असल्याचा दावा त्यांनी केला. अमली पदार्थांविरोधात लढायचे असेल, तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः नशेत असता कामा नये, असेही ते म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीन वर्षांत पंजाबमधील अमली पदार्थांची समस्या संपवण्याची घोषणा केली होती. मात्र, ते तीन वर्षे गृहमंत्री राहतील की नाही, याबाबत शंका व्यक्त करत केंद्रातील सरकार वर्षभरही टिकणार नसल्याचा अंदाज राहुल गांधी यांनी व्यक्त केला. काँग्रेस सत्तेत आल्यास पंजाबचा कारभार पंजाबमधूनच चालवला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
हे ही वाचा:
होर्मुझमधील निर्बंधांतून भारताला सूट
अग्निवीरांचा सेवाकाळ चार वरून सहा वर्षे!
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील ‘एम’ फॅक्टर
ज्येष्ठ पत्रकार शेखर जोशी यांचे निधन
अमली पदार्थांच्या समस्येचा संबंध बेरोजगारीशी जोडत त्यांनी उद्योग, कारखाने आणि शेतीला बळ देण्याची गरज मांडली. क्रीडा साहित्य, वस्त्रोद्योग आणि वाहननिर्मितीशी संबंधित उद्योग पुन्हा उभे करण्याचे आवाहन केले. गुंडगिरी आणि गोळीबार रोखण्यासाठी रोजगारनिर्मिती आवश्यक असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकार अदानीसारख्या अब्जाधीशांच्या हितासाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत, ट्रम्प यांच्या दबावाखाली मोदींनी केलेल्या व्यापार करारामुळे शेतकरी आणि लघुउद्योजकांच्या हिताशी तडजोड झाल्याचेही ते म्हणाले. मोदींना खुल्या चर्चेचे आव्हान देत संसदेत विरोधकांना बोलू दिले जात नसल्याची टीकाही त्यांनी केली.
