संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीतील सर्व अडथळे दूर करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केला. महिला आरक्षणाबाबत केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
केंद्र सरकार संसदेत सुधारित परिसीमन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयक पुढे नेण्याच्या तयारीत असताना पंतप्रधान मोदी यांनी हे विधान केले आहे. एक्स या समाजमाध्यमावर व्हीडिओ पोस्ट करत मोदी म्हणाले की, महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी अनेक दशकांपासून संघर्ष सुरू आहे. अनेक महिलांनी पत्रांच्या माध्यमातून तसेच वैयक्तिक भेटी आणि संवादातून त्यांच्याकडे हा मुद्दा मांडला आहे.
महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मार्गात येणारा प्रत्येक अडथळा दूर करण्याची ग्वाही त्यांनी देशातील महिलांना दिली.
मोदी म्हणाले, “महिला आरक्षणाला विरोध करणारे पक्ष देशातील नारीशक्तीला संसद आणि विधानसभांमध्ये अधिकाधिक सहभाग घेण्यापासून कधीही रोखू शकणार नाहीत. ही केवळ काळाची बाब आहे.”
महिला आरक्षणाबाबत सरकारचा निर्धार ठाम असून देशातील महिलांचा या प्रयत्नांना पाठिंबा असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानमध्ये शाळेत भीषण स्फोट
भारताच्या परकीय चलनसाठ्याला पुन्हा मोठा धक्का
बिसलेरीच्या पाण्यात पुन्हा जीवाणू
महिला आरक्षणाचा परिसीमन प्रक्रियेशी संबंध
पंतप्रधान मोदी यांचे हे विधान केंद्रीय मंत्रिमंडळाने ३३ टक्के महिला आरक्षणाची अंमलबजावणी लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये करण्याच्या उद्देशाने नव्या विधेयकांच्या प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आले आहे.
या प्रस्तावांमध्ये संविधान (१३२ वी घटनादुरुस्ती) विधेयक, २०२६ आणि परिसीमन (दुसरे) विधेयक, २०२६ यांचा समावेश आहे. संविधानाची १०६ वी घटनादुरुस्ती, २०२३ म्हणजेच महिला आरक्षण कायद्यानुसार लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमधील एकूण जागांपैकी एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या आरक्षणाची अंमलबजावणी संबंधित जनगणनेची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर होणाऱ्या परिसीमन प्रक्रियेशी जोडण्यात आली होती. केंद्र सरकारच्या सुधारित प्रस्तावानुसार परिसीमनाच्या माध्यमातून महिला आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न आहे. त्याचवेळी लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमधील सदस्यसंख्येत ५० टक्क्यांनी वाढ करण्याचाही प्रस्ताव आहे.
या प्रस्तावानुसार लोकसभेची कमाल सदस्यसंख्या ८५० पर्यंत वाढवण्यात येणार आहे. यामध्ये राज्यांसाठी ८१५ जागा, तर केंद्रशासित प्रदेशांसाठी ३५ जागा असतील.
त्याचप्रमाणे राज्यांच्या विधानसभांची कमाल सदस्यसंख्याही वाढवून ६५० करण्याचा प्रस्ताव आहे.
लोकसंख्येच्या आधारे परिसीमन केल्यास दक्षिणेकडील राज्यांच्या संसदीय प्रतिनिधित्वाचा वाटा कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. या राज्यांच्या आक्षेपांचे निराकरण करण्यासाठी सुधारित सूत्रात २०५१ पर्यंत लोकसभेतील राज्यांच्या जागांचे सध्याचे प्रमाण कायम ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
