देशाचे प्रतिनिधित्व करणे आणि देशासाठी पदक जिंकणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे तिने सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना दबाव स्वतःवर वरचढ होऊ दिला नाही. सर्वोत्तम कामगिरी करण्यावर आणि खेळातील चुका कमी करण्यावर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले होते, असे उद्गार भारताची युवा बॅडमिंटनपटू तन्वी पत्री हिने काढले.
सेनेगलमधील डकार येथे आयोजित करण्यात आलेल्या यूथ ऑलिम्पिक गेम्स २०२६ मध्ये भारताची बॅडमिंटनपटू तन्वी पत्री हिने शानदार कामगिरी करत महिला एकेरी स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. अवघ्या १५ वर्षांच्या वयात ही ऐतिहासिक कामगिरी करत तिने भारतीय क्रीडा क्षेत्रात नवा विक्रम नोंदवला आहे. यूथ ऑलिम्पिकच्या बॅडमिंटन स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. या यशामुळे तन्वीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय बॅडमिंटनला नवी ओळख मिळवून दिली आहे. शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना तन्वीने आपल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.
हे ही वाचा:
दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सोने-चांदी चमकले
लिओनेल मेस्सीचा गोल्डन बूटवर पुन्हा कब्जा; इतिहास रचला!
इस्रायलमध्ये गादी आयझेनकोट यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण
कॅन्सरवरील औषधांच्या किमतीत ९६ टक्क्यांपर्यंत कपात
अंतिम सामन्यात तन्वीला विद्यमान जागतिक ज्युनियर विजेती चीनची झांग यी शिन हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. या चुरशीच्या सामन्यात तन्वीने प्रतिस्पर्धीचे सहा मॅच पॉइंट वाचवले. तसेच सुवर्णपदक जिंकण्याच्या तीन संधीही तिला मिळाल्या होत्या. मात्र, अखेर तिला २१-१५, १३-२१, २४-२६ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला.
तन्वीच्या मते, संपूर्ण स्पर्धेतील अंतिम सामना तिच्यासाठी सर्वाधिक कठीण होता. तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये सतत गुणांची बरोबरी होत असल्याने सामना अधिकच आव्हानात्मक बनला होता. रौप्यपदक मिळाले असले तरी आपल्या कामगिरीवर ती पूर्णपणे समाधानी नाही. अंतिम सामन्यात आणखी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून खेळले असते आणि चुका कमी केल्या असत्या, तर यापेक्षा चांगला निकाल मिळवता आला असता, असे तिने सांगितले.
श्रेय आईवडील, प्रशिक्षकांना
या यशाचे श्रेय देताना तन्वीने सर्वप्रथम आपल्या आई-वडिलांचे आभार मानले. याशिवाय प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफने दिलेल्या योगदानाचेही तिने कौतुक केले. भारतीय संघ आणि प्रायोजकांकडून आपल्याला मोठे सहकार्य मिळाल्याचे तिने सांगितले.
भविष्यातील योजनांबाबत बोलताना तन्वीने लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे हे आपले प्रमुख लक्ष्य असल्याचे सांगितले. याशिवाय पुढील वर्षी होणाऱ्या आशियाई ज्युनियर आणि जागतिक ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धा जिंकण्याचेही तिचे उद्दिष्ट आहे.
