न्यूझीलंड अ संघाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारत अ संघाने आपली पहिली खेळी ५ बाद ४६४ धावांवर घोषित केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंड अ संघाने २ गडी गमावून ३६ धावा केल्या होत्या.
भारत अ संघाने दुसऱ्या दिवशीच्या खेळाला २ बाद २२७ धावांवरून सुरुवात केली. साई सुदर्शन आणि कर्णधार ध्रुव जुरेल यांनी आपली खेळी पुढे सुरू केली. सुदर्शनने आपल्या कालच्या ७७ धावांच्या खेळीत आणखी ११ धावांची भर घातली. मात्र, ८८ धावांवर तो बाद झाला. २५५ चेंडूंच्या खेळीत त्याने ११ चौकार लगावले.
कर्णधार ध्रुव जुरेलनेही शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ९५ चेंडूंत २ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ७१ धावांची खेळी केली. तिलक वर्मा १६४ चेंडूंत २ षटकार आणि ५ चौकारांसह ८१ धावांवर नाबाद राहिला. त्याला वॉशिंग्टन सुंदरने चांगली साथ दिली. सुंदरने १०७ चेंडूंत ५० धावांची नाबाद खेळी केली. रवींद्र जडेजा २५ धावा करून बाद झाला.
सामन्याच्या पहिल्या दिवशी सलामीवीर यशस्वी जैस्वालने शानदार शतक झळकावले होते. त्याने १३८ चेंडूंत २ षटकार आणि १६ चौकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या होत्या. जैस्वालचे हे सलग दुसरे शतक ठरले. भारत अ संघाने १४६ षटकांत ५ गडी गमावून ४६४ धावा केल्यानंतर आपली पहिली खेळी घोषित केली.
हे ही वाचा:
फडणवीसांची ती ‘दिवाळी भेट’ अत्यंत हृदयस्पर्शी!
कुख्यात गँगस्टर गुरविंदरला इथिओपियातून भारतात आणले
दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये नऊ वर्षांनंतर बाजार घसरला
कॅन्सरवरील औषधांच्या किमतीत ९६ टक्क्यांपर्यंत कपात
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंड अ संघाने २ बाद ३६ धावा केल्या होत्या. डीन फॉक्सक्रॉफ्ट १० धावांवर, तर जॅक गिब्सन १ धावेवर खेळत होता. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने दोन्ही फलंदाजांना बाद केले. भारत अ आणि न्यूझीलंड अ संघांदरम्यान खेळली जाणारी ही तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरी आणि अखेरची अनधिकृत कसोटी आहे. या सामन्यानंतर दोन्ही देशांच्या वरिष्ठ संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे.
यशस्वी जैस्वालने पुन्हा एकदा सूर गवसल्याचे दाखवून दिल्याने भारतीय संघासाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे. आगामी कसोटी मालिकेत केएल राहुलसोबत जैस्वाल भारतीय डावाची सुरुवात करणार आहे.
