भारतीय कसोटी संघाचा आधारस्तंभ ठरणार!

भारतीय कसोटी संघाचा आधारस्तंभ ठरणार!

भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर कसोटी फलंदाजीची धुरा कोण सांभाळणार, याबाबत अनेक चर्चा सुरू असतानाच माजी दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांनी शुभमन गिलवर मोठा विश्वास व्यक्त केला आहे. अश्विन यांच्या मते, गिलमध्ये भारतीय कसोटी संघाच्या नव्या युगाचे नेतृत्व करण्याची क्षमता असून तो आगामी काळात संघाचा प्रमुख फलंदाज ठरू शकतो.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ६ जूनपासून न्यू चंदीगड येथे एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी अश्विन यांनी गिलच्या फलंदाजीसह त्याच्या नेतृत्वगुणांचेही तोंडभरून कौतुक केले.

“कर्णधारपदाचा दबावही सहज पेलला”

‘जिओहॉटस्टार’शी बोलताना अश्विन म्हणाले,

“शुभमन गिलने इंग्लंडमध्ये अप्रतिम मालिका खेळली. कर्णधारपद मिळाल्यानंतर त्याने केवळ फलंदाज म्हणूनच नव्हे तर नेता म्हणूनही स्वतःला सिद्ध केले. कठीण परिस्थितीत धावा काढणे आणि कर्णधारपदाचा दबाव परिपक्वतेने हाताळणे ही मोठी गोष्ट आहे.”

अश्विन यांच्या मते, गिलने आपल्या तंत्रावर विशेष मेहनत घेतली आहे.

“त्याने बॅट आणि पॅडमधील अंतर कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यामुळे फिरकी गोलंदाजीविरुद्ध त्याची कामगिरी अधिक भक्कम झाली आहे.”

“भारतातही मोठ्या खेळी येणार”

कर्णधार झाल्यानंतर गिलने अद्याप मायदेशात फार मोठी खेळी केलेली नसली, तरी अश्विन यांना त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे.

त्यांच्या मते,

“गिलमध्ये दीर्घ खेळी करण्याची क्षमता आहे. तो पुढील अनेक वर्षे भारतीय कसोटी फलंदाजीचा कणा ठरू शकतो.”

कुलदीप यादववर मोठी जबाबदारी

रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीत भारतीय फिरकी आक्रमणाची जबाबदारी कुलदीप यादव यांच्यावर असेल, असे अश्विन यांनी स्पष्ट केले.

“कुलदीप सध्या उत्कृष्ट लयीत आहे. त्याची चेंडू दोन्ही बाजूंना वळवण्याची क्षमता आणि भारतीय खेळपट्ट्यांवरील अनुभव संघासाठी महत्त्वाचा ठरेल.”

वॉशिंग्टन सुंदरचेही कौतुक

अश्विन यांनी वॉशिंग्टन सुंदर यांच्याबद्दलही सकारात्मक मत व्यक्त केले.

त्यांच्या मते,

हर्ष दुबेच्या पदार्पणाकडे लक्ष

युवा फिरकीपटू हर्ष दुबे याच्याबाबतही अश्विन उत्सुक आहेत.

“हर्षने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सातत्याने प्रभावी कामगिरी केली आहे. त्यामुळे तो कसोटी पदार्पणासाठी मजबूत दावेदार आहे. त्याला संधी मिळाल्यास मी त्याला खेळताना पाहण्यासाठी उत्सुक असेन.”

अश्विन यांच्या या वक्तव्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीत हर्ष दुबेला संधी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version