भारतीय धावपटू गुलवीर सिंहने एशियन गेम्स २०२६ मध्ये इतिहास रचताना पदकांची हॅट्रिक पूर्ण केली आहे. गुलवीरने मंगळवारी मिझुहो पार्क ऍथलेटिक स्टेडियममध्ये झालेल्या पुरुषांच्या ५००० मीटर धावण्याच्या अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकले. गुलवीरने ही शर्यत १३:३२.७५ सेकंदांत पूर्ण केली. बहरीनच्या बिरहानु बालेवने १३:३०.७९ सेकंदांच्या वेळेसह सुवर्णपदक पटकावले, तर जपानच्या यामागुची टोमोनोरीने १३:३१.४३ सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले.
यापूर्वी गुलवीरने एशियन गेम्स २०२६ मध्ये पुरुषांच्या १०,००० मीटर आणि १५०० मीटर शर्यतीत रौप्यपदके जिंकली होती. त्यामुळे ५००० मीटरमधील कांस्यपदकासह त्याने या स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत तीन पदके जिंकण्याचा पराक्रम केला आहे. गेल्या ४० वर्षांत एशियन गेम्सच्या एकाच आवृत्तीत तीन पदके जिंकणारा तो पहिला भारतीय अॅथलीट ठरला आहे. यापूर्वी पी. टी. उषा यांनी १९८६च्या एशियन गेम्समध्ये चार पदके जिंकली होती.
हे ही वाचा:
सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म १४-१५ वर ७५ दिवसांचा ट्रॅफिक-पॉवर ब्लॉक
कोठी क्रमांक ९६० पंजाबमध्ये ‘आप’चे लफडा सदन
बांगलादेशात अणुइंधन नेणाऱ्या रशियन विमानाला पाकने एअरस्पेस नाकारली
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
५००० मीटरच्या अंतिम शर्यतीच्या सुरुवातीपासूनच गुलवीर आघाडीच्या धावपटूंच्या गटात राहिला. सुरुवातीचे २००० मीटर पूर्ण झाल्यानंतर तो तिसऱ्या स्थानावर होता. शर्यतीच्या निर्णायक टप्प्यातही त्याने आपले स्थान कायम राखले. मात्र, पहिल्या दोन स्थानांसाठी त्याला आव्हान देता आले नाही आणि अखेर त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
यापूर्वी गुलवीरने पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीतही शानदार कामगिरी करत २८:२९.३८ सेकंदांची वेळ नोंदवली होती आणि रौप्यपदक जिंकले होते. या कामगिरीसह एशियन गेम्समध्ये १०,००० मीटर प्रकारात दोन पदके जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. गुलवीरने यापूर्वी २०२३च्या हांगझोऊ एशियन गेम्समध्ये १०,००० मीटरमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
यानंतर गुलवीरने पुरुषांच्या १५०० मीटर शर्यतीत आणखी एक रौप्यपदक आपल्या नावावर केले. त्याने ३:३६.७२ सेकंदांच्या आपल्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह दुसरे स्थान मिळवले.
