भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा टी-२० सामना हॅमिल्टन येथील सेडन पार्क मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय फलंदाज ईशान किशनने ३२ चेंडूंत ६१ धावांची आक्रमक खेळी करत ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला.
या सामन्यात सहावी धाव पूर्ण करताच ईशानने सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा ईशान हा भारतीय फलंदाज ठरला आहे. सूर्यकुमारने २०२२ मध्ये ३२ सामन्यांत १,१६४ धावा केल्या होत्या. तर ईशानने २०२६ मध्ये आतापर्यंत ३७ सामन्यांत १,२२० धावा केल्या आहेत.
याशिवाय ईशानने टी-२० क्रिकेटमध्ये दोन हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला. चेंडूंच्या तुलनेत सर्वात जलद दोन हजार धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने १,३४५ चेंडूंत हा टप्पा गाठला. या यादीत अभिषेक शर्मा १,०२४ चेंडूंसह पहिल्या, तर सूर्यकुमार यादव १,१६४ चेंडूंसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हे ही वाचा:
हा विरोधी पक्ष नव्हे, तर अडथळा पक्ष!
जुरेलच्या शतकामुळे भारत ‘अ’च्या ३४६ धावा
मुंबई विमानतळावर १९ नोव्हेंबरला सहा तासांचा मेगाब्लॉक
भारताच्या नाविकला बळ देणारा एनव्हीएस-०३
सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. अभिषेक शर्मा १ आणि संजू सॅमसन ४ धावा करून बाद झाले. भारताची १९ धावांवर दोन बाद अशी स्थिती असताना ईशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अवघ्या ४३ चेंडूंत ९३ धावांची भागीदारी केली.
ईशानने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या ६१ धावांच्या खेळीत पाच चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. श्रेयस अय्यरनेही २३ चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ५० धावांची खेळी केली.
या सामन्यासाठी भारतीय संघाने अंतिम अकरामध्ये दोन बदल केले. वरुण चक्रवर्ती आणि भुवनेश्वर कुमार यांना संधी देण्यात आली, तर मयंक यादव आणि अक्षर पटेल यांना संघाबाहेर ठेवण्यात आले.
