दिल्ली-एनसीआरमध्ये शुक्रवारी अचानक हवामानाने रौद्र रूप धारण केले. काळेकुट्ट ढग दाटून आल्यानंतर दिल्लीसह नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादच्या अनेक भागांत मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. जोरदार पाऊस, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दिल्लीमध्ये काही भागांत अवघ्या काही तासांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रस्त्यांवर पाणी साचले. पश्चिम दिल्लीतील सागरपूरच्या गांधी मार्केटसह अनेक निवासी भाग जलमय झाले.
या मुसळधार पावसाचा मोठा फटका इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळालाही बसला. विमानतळाच्या प्रवेशमार्ग आणि फोरकोर्ट परिसरात पाणी साचल्याने विमान वाहतुकीवर परिणाम झाला. शुक्रवारी दुपारी साडेतीन ते साडेचार या एका तासात दिल्लीकडे येणारी तब्बल नऊ विमाने जयपूर, लखनऊ आणि अहमदाबादकडे वळवण्यात आली. यामध्ये चार विमाने जयपूरला, चार लखनऊला, तर एक विमान अहमदाबादला वळवण्यात आले. दरम्यान, पालममध्ये दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच या तीन तासांत तब्बल ७२.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नारायणामध्ये ५४ मिलिमीटर, जनकपुरीत ४८.५ मिलिमीटर, लोधी रोडवर ३४.६ मिलिमीटर आणि सफदरजंगमध्ये ३२.६ मिलिमीटर पाऊस पडला. पालम विमानतळावर वाऱ्याचा वेग ताशी ७६ किलोमीटरपर्यंत पोहोचला.
हे ही वाचा:
चायना मास्टर्समध्ये श्रीकांतचा प्रवास संपला
एका तासाच्या मुसळधार पावसानंतर दिल्ली विमानतळ जलमय
स्वतंत्र भारद्वाजला बुलंदशहरातून अटक
अॅडोबच्या सीईओपदी भारतीय वंशाचे अनिल चक्रवर्ती
हवामान विभागाच्या अंदाजानुसार शनिवार, ५ सप्टेंबरलाही दिल्ली-हरियाणा-चंदीगड परिसरात मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. दिल्लीमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. उत्तर-मध्य भारतातील सक्रिय मान्सून प्रणाली आणि ईशान्य मध्य प्रदेश परिसरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, ६ सप्टेंबरनंतर दिल्लीसाठी मुसळधार पावसाचा इशारा नसून हलका पाऊस किंवा रिमझिम सुरू राहण्याची शक्यता आहे.
