घरविशेषप्रा.शोभिता जैन; हेवा वाटावे असे लखलखीत आयुष्य...

प्रा.शोभिता जैन; हेवा वाटावे असे लखलखीत आयुष्य…

वयाच्या ८५ व्या वर्षी प्रा. शोभिता जैन यांनी या जगाचा निरोप घेतला. जन्म-मृत्यू ही जगरहाटी आहे, ती कोणालाही टळलेली नाही. माणूस कसा जगला, हाच मुद्दा एकाचे जीवन दुसऱ्यापासून वेगळे करतो. एखादी जवळची व्यक्ती आपण गमावतो तेव्हा “ही व्यक्ती पुन्हा कधीही दिसणार नाही” या विचाराने मन दुःखी होते; परंतु काही लोक त्यांच्या हयातीत एवढे मोठे कार्य करून जातात की, ते कार्यच त्यांची कायमची आठवण बनून राहते. प्रा. शोभिता जैन यांच्या निधनाचे वृत्त कळल्यानंतर माझ्या मनात नेमका हाच विचार आला.

त्यांचे जाणे मन सुन्न करणारे आहे. एका अत्यंत उत्तुंग आणि आदरास पात्र व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. माझे आयपीएस (IPS) मित्र शिरीष जैन यांच्या त्या मातोश्री. मी त्यांच्याबाबत बरेचदा ऐकले आणि वाचले होते, परंतु भेटीचे भाग्य मात्र मला कधी लाभले नाही. कॉर्पोरेट आणि प्रशासकीय जगतात काम करताना आम्ही अनेकदा नेतृत्व, संघटनकौशल्य आणि शाश्वत विकासाच्या गप्पा मारतो; पण प्रा. शोभिता जैन यांचे जीवन आणि कार्य पाहिले की, समाजावर ठसा उमटवणारे आयुष्य आणि ‘सामाजिक नेतृत्व’ म्हणजे नेमके काय, हे समजते.

त्यांच्या जीवनप्रवासाचा आणि कामगिरीचा आढावा घेतला, तेव्हा मी अक्षरशः अचंबित झालो! १९५८-६० च्या दशकात अलाहाबाद आणि लखनऊ विद्यापीठातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणे, त्यानंतर कॅनबेरा, ऑक्सफर्ड ते थेट जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) असा आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक प्रवास करणे, हे त्या काळीच नव्हे तर आजच्या काळातही कोणत्याही महिलेसाठी अत्यंत असामान्य आणि प्रेरणादायी आहे.

इग्नू (IGNOU) मधील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी दूरस्थ शिक्षणाचा पाया मजबूत केला. देशाच्या दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी त्यांनी स्वतः तिथे जाऊन कार्यशाळा घेतल्या. आजच्या कॉर्पोरेट भाषेत सांगायचे तर, त्यांनी शिक्षणाचे ‘लास्ट-माईल डिलिव्हरी’ (Last-mile delivery) मॉडेल अत्यंत यशस्वीपणे राबवले. आसाममधील चहाच्या मळ्यांतील महिला कामगारांवर त्यांनी केलेला शोधनिबंध असो, मलेशियातील रबर बागांवरील अभ्यास असो किंवा चिपको आंदोलनातील महिलांच्या भूमिकेवरील प्रसिद्ध लेख असो—त्यांचा भर नेहमी प्रत्यक्ष जमिनीवरील वास्तवावर आणि सामाजिक बदलावरच राहिला. FAO आणि वर्ल्ड बँकेसारख्या जागतिक संस्थांनी त्यांच्या अनुभवाचा व सल्ल्याचा उपयोग करून घेतला, यातच त्यांच्या ज्ञानाची ताकद दिसून येते.

ऑक्सफर्डमध्ये शिकत असताना संसार सांभाळणे, मुलांचे संगोपन करणे, जगभर संशोधन करणे आणि शेवटी IGNOU च्या ‘स्कूल ऑफ सोशल सायन्सेस’चे संचालकपद भूषवणे—हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी केवळ स्वतःचे करिअर घडवले नाही, तर कुटुंबालाही तेवढेच योगदान दिले. मुलांवर उत्तम संस्कार केले, त्यांचे आयुष्य घडवले. करिअर आणि कुटुंब या दोन्ही घटकांना त्यांनी तितकेच महत्त्व दिले. या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांनी दाखवलेला समतोल अत्यंत कौतुकास्पद आहे; आजच्या महिलांसाठी हे एक उत्तम उदाहरण आहे.

प्रा. शोभिता जैन यांनी त्यांच्या ८५ वर्षांच्या आयुष्यात शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात जे योगदान दिले आहे, ते येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. एका अत्यंत समर्पित, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेल्या या थोर विदुषीला माझी भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या परिजनांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version