घरविशेषदिवाळीतील प्रदूषण, आगीच्या घटनांवरून उच्च न्यायालय नाराज

दिवाळीतील प्रदूषण, आगीच्या घटनांवरून उच्च न्यायालय नाराज

पोलिस, महापालिका प्रशासनाला फटकारले

दिवाळीदरम्यान मुंबईत फटाक्यांमुळे वाढलेले वायू आणि ध्वनिप्रदूषण तसेच आगीच्या घटनांची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर व्यापक बंदी घालण्याचे संकेत दिले आहेत. नागरिक नियमांचे पालन करत नसतील, तर वैयक्तिक पातळीवर फटाके फोडण्यास बंदी घालून केवळ निर्धारित सार्वजनिक मैदानांवर मर्यादित वेळेसाठी सामूहिक आतषबाजीला परवानगी देण्याचा विचार न्यायालयाने मांडला. पोलिस आणि महापालिका प्रशासन निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करू शकले नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सण-उत्सवांतील ध्वनिप्रदूषणासंदर्भातील जनहित याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी दिवाळीत मुंबईत ३०० हून अधिक आगीच्या घटना घडल्याची माहिती देण्यात आली. काही वृत्तांनुसार हा आकडा ३५० आहे. शहरातील हवेची गुणवत्ता खालावल्याबद्दलही न्यायालयाने चिंता व्यक्त केली. फटाके रात्री उशिरापर्यंत, अगदी पहाटे ३ वाजेपर्यंत फोडले जात असल्याबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि प्रदूषणाचा त्रास होणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा विचार करणे आवश्यक असून, आतषबाजीमुळे इतरांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होता कामा नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

दरम्यान, राज्य सरकारने सुनावणीदरम्यान दिवाळीत नियमभंगाप्रकरणी सुमारे ५०० पोलिस गुन्हे दाखल केल्याची आणि २० लाख रुपयांहून अधिक किमतीचे फटाके जप्त केल्याची माहिती दिली. मात्र, संपूर्ण राज्यात फटाक्यांवर बंदी घालणे योग्य नसल्याची भूमिका सरकारने मांडली. महापालिकेनेही उपाययोजना सुचवण्यासाठी वेळ मागितला.

हे ही वाचा:

काँग्रेसकडून उपदेशाची गरज नाही

कुख्यात गुंड नसीम दुर्रानी चकमकीत ठार

अमित देशमुखांकडून टिपू सुलतानचा उदो उदो!

अखिलेश अयोध्येत उतरले तर मीही भिडणार; योगींचा हुंकार!

दुसरीकडे, याचिकाकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली. गुटखाबंदीचा दाखला देत नागरिकांच्या आरोग्यासाठी कठोर निर्बंध शक्य असल्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने या प्रकरणातील आदेश राखून ठेवला असून, ७ डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version