घरविशेषफ्लायदुबई विमानातील हल्ल्याचा तपास आता एनआयएकडे

फ्लायदुबई विमानातील हल्ल्याचा तपास आता एनआयएकडे

मोठ्या आंतरराष्ट्रीय कटाची शक्यता तपासणार

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे अर्थात एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. या घटनेमागे वैयक्तिक कारण होते की विमानाचे अपहरण करून ते पाडण्याचा मोठा कट होता, याचा तपास केला जाणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानंतर एनआयएने या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
ही घटना ३० सप्टेंबर रोजी घडली. फ्लायदुबईचे विमान दुबईहून १७४ प्रवासी आणि सहा कर्मचारी घेऊन रवाना झाले होते. विमानाचे मुख्य वैमानिक भारतीय नागरिक कॅप्टन स्मित मच्छार होते, तर सहवैमानिक ओमानचा नागरिक होता. विमान जॉर्डन आणि सौदी अरेबियाच्या सीमेजवळ असताना सहवैमानिकाने कॉकपिटमध्येच मच्छार यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि हातांना गंभीर जखमा झाल्या. आरोपीचा उद्देश विमानाचे अपहरण करणे किंवा ते पाडण्याचा प्रयत्न करणे हा होता का, याचाही तपास केला जात आहे.
हे ही वाचा:
दिल्लीतल्या कॉक्रोच आंदोलनाला सरकारचा दणका

मध्य रेल्वेचा ‘स्वच्छता रथ’ धावला; १.६८ लाख किलो कचऱ्याची विल्हेवाट

इम्पॅक्ट प्लेयर’ नियम हटवा!

दादरच्या हॉकर्स प्लाझात अनधिकृत गाळ्यांचा विळखा?
हल्ल्यानंतर विमानातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. अन्य वैमानिकांनी विमानाचे नियंत्रण हाती घेत परिस्थिती सावरली. त्यानंतर विमान सौदी अरेबियातील तबूक येथील प्रिन्स सुलतान बिन अब्दुलअजीज विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले. या घटनेनंतर सौदी प्रशासनाने आरोपीला ताब्यात घेतले. विमानातील प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वैमानिक आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे मानले जात आहे.
या प्रकरणात विमान अपहरणविरोधी कायदा आणि बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत अर्थात यूएपीएअंतर्गत गुन्हा घडल्याचा संशय तपासला जात आहे. आरोपीची पार्श्वभूमी, हल्ल्यामागील हेतू आणि संभाव्य संपर्क यांची माहिती एनआयए गोळा करणार आहे. या घटनेमागे संघटित कट किंवा अन्य व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जाईल. मात्र, आंतरराष्ट्रीय कट असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. या तपासामुळे विमान वाहतुकीतील सुरक्षा व्यवस्था, वैमानिकांची पडताळणी आणि कॉकपिटमधील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version