घरविशेषसाहिल वाकोडेशी कोणताही जातीभेद झाला नाही!

साहिल वाकोडेशी कोणताही जातीभेद झाला नाही!

जवळच्या मित्राने दिले स्पष्टीकरण

- Advertisement -

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल रवींद्र वाकोडे यांच्या मृत्यूनंतर कॅम्पसमध्ये आंदोलन आणि जातीय भेदभावाचे आरोप सुरू असतानाच, त्यांच्या एका जवळच्या मित्राने या घटनेत जातीयवादाची भूमिका असल्याच्या दाव्याला विरोध केला आहे. वाकोडे यांचे मित्र यतीश कुमार याने ‘एनडीटीव्ही’शी बोलताना सांगितले की, साहिलला जातीय भेदभावाचा सामना करावा लागत असल्याचे सूचित करणारी कोणतीही बाब त्यांनी कधीही पाहिली नव्हती. परीक्षेच्या चार-पाच दिवस आधी त्यांची साहिलशी भेट झाली होती. त्यावेळी तो नेहमीप्रमाणेच “मजेशीर, निवांत आणि आनंदी” दिसत होता, अशी आठवण कुमार यांनी सांगितली.

द्वितीय वर्षाचा बीटेक विद्यार्थी असलेल्या साहिल वाकोडेचा शुक्रवारी त्याच्या वसतिगृहातील खोलीत मृतदेह आढळला. त्याआधी मध्यसत्र परीक्षेदरम्यान तो मोबाइल फोन आणि चॅटजीपीटीचा कथित वापर करताना आढळला होता.

कुमार याच्या म्हणण्यानुसार, साहिलला पकडल्यानंतर एका प्राध्यापकांनी त्याला परीक्षा कक्षाबाहेर नेले. त्यानंतर संस्थेच्या शिस्तभंग कृती समितीने (डीएसी) त्याच्यावर कारवाई केली नसल्याचे आपल्याला सांगण्यात आले होते, असे कुमार याने सांगितले. मात्र, त्यानंतर साहिलसोबत नेमके काय घडले, याची आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

साहिलच्या कुटुंबीयांनी संस्थात्मक छळ आणि जातीय भेदभावाचे आरोप केले आहेत. या प्रकरणात त्यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, १९८९ अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. साहिलच्या मृत्यूभोवती निर्माण झालेल्या वादामध्ये हे आरोप महत्त्वाचा मुद्दा ठरले आहेत. मात्र, कॅम्पसमधील आपल्या अनुभवाच्या आधारे यतीश कुमार याने वेगळी बाजू मांडली.

कुमार याने एनडीटीव्हीला सांगितले, “मला वाटत नाही की जातीयवाद हा मुद्दा होता. म्हणजे, मला स्वतःला असा अनुभव कधीच आला नाही.” मात्र, साहिल आणि आपण वेगवेगळ्या विभागांमध्ये असल्यामुळे त्याच्यासोबत घडलेल्या प्रत्येक घटनेची आपल्याला संपूर्ण माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

सिम कार्डच्या गैरवापरावर ३ वर्षांचा तुरुंगवास

रणगाड्यांना मिळणार ‘स्वदेशी पॉवर’! ५८६ कोटींचा करार

दसऱ्यापासून भारतीय उत्पादने न्यूझीलंडमध्ये ‘शुल्कमुक्त’!

आयआयटी मुंबईचे प्रा. डूल्ला अधिष्ठातापदावरून निलंबित

‘कॉपी करणे चुकीचे आहे, पण…’

आयआयटी मुंबईसारख्या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांवर असलेल्या प्रचंड दबावाच्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे पाहण्याची गरज असल्याचे कुमार यांनी म्हटले. परीक्षेत कॉपी करणे चुकीचे असल्याचे मान्य करताना, शिस्तभंगाची कारवाई करताना विद्यार्थ्याची परिस्थिती आणि मानसिक अवस्था लक्षात घेणे आवश्यक आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

कुमार म्हणाले, “कॉपी करणे चुकीचे आहे. पण शिक्षा करताना विद्यार्थ्याची मानसिक अवस्था समजून घेणे आणि त्याच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे.”

कुमार यांनी साहिल हा कॅम्पसमधील त्यांच्या पहिल्या मित्रांपैकी एक असल्याचे सांगितले. पहिल्या वर्षात दोघे शेजारील खोल्यांमध्ये राहत होते आणि त्यांनी एकत्र बॅडमिंटनही खेळले होते. “तो माझ्या पहिल्या मित्रांपैकी एक होता,” अशी आठवण कुमार यांनी सांगितली. साहिलच्या मृत्यूमुळे संपूर्ण कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसल्याचेही त्यांनी म्हटले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version