घरविशेषजळगावातील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

जळगावातील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

जामनेर-बोदवड मार्गावर काळाचा घाला

जळगाव जिल्ह्यातील जामनेर-बोदवड मार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन बालकांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जामनेर तालुक्यातील वाडी फाट्याजवळ भरधाव मालमोटारीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील सहाही जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि तीन बालकांचा समावेश असून, अवघ्या तीन महिन्यांच्या बाळाचाही या अपघातात जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्ती मध्य प्रदेशातील असून, मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. वाडी फाट्याजवळील पेट्रोलपंपावर दुचाकीत पेट्रोल भरल्यानंतर ते बाहेर पडत असताना समोरून येणाऱ्या भरधाव मालमोटारीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीवरील सर्व सहा जण गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. एका क्षणात संपूर्ण कुटुंबावर काळाने घाला घातल्याने या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
हे ही वाचा:
टीम इंडियाच्या फलंदाजांना गावस्करांचा सज्जड दम

गोलंदाजांनीच बुडवली भारताची नौका

८५ पदकांच्या शिलेदारांचा मोदींकडून गौरव!

“होय, आम्हाला सत्तापरिवर्तन हवे आहे!”
अपघाताची माहिती मिळताच जामनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, अपघातानंतर मालमोटारीचा चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपासही सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे जामनेर-बोदवड मार्गावरील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ आणि वाहनांचा वेग यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. अपघातप्रवण ठिकाणी गतिरोधक, सूचना फलक आणि वाहतूक नियंत्रणाच्या प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. निष्पाप बालकांसह सहा जणांचा बळी घेणाऱ्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्ते सुरक्षेसाठी तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version