घरक्राईमनामाबीडमध्ये ऊसतोड मजुराचे अपहरण करून चार दिवस अमानुष छळ

बीडमध्ये ऊसतोड मजुराचे अपहरण करून चार दिवस अमानुष छळ

बेदम मारहाण आणि तोंडात लघुशंका केल्याचा गंभीर आरोप

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातून ऊसतोड मजुरांवरील अत्याचाराचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. उचल म्हणून घेतलेले पैसे परत न केल्याच्या कारणावरून ऊसतोड मजूर देवीदास कापसे यांचे अपहरण करून तब्बल चार दिवस एका अज्ञात ठिकाणी डांबून ठेवण्यात आले. या काळात त्यांना बेदम मारहाण करण्यात आली, उपाशी-तापाशी ठेवण्यात आले आणि त्यांच्या तोंडात लघुशंका केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून ऊसतोड मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवीदास कापसे हे गेवराई तालुक्यातील उमापूर येथील रहिवासी असून ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. त्यांनी घेतलेल्या उचलीच्या पैशांवरून त्यांचा मुकादम गणेश थोरात याच्याशी वाद झाला होता. याच वादातून मुकादम आणि त्याच्या साथीदारांनी देवीदास यांचे जबरदस्तीने अपहरण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांना एका अज्ञात ठिकाणी चार दिवस बेकायदेशीरपणे कैद करून ठेवण्यात आले. या काळात लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली, अन्न-पाणी न देता शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. पीडिताच्या कुटुंबीयांनी आरोपींनी मानहानी करण्याच्या उद्देशाने त्यांच्या तोंडात लघुशंका केल्याचाही गंभीर आरोप केला आहे.
हे ही वाचा:
गांगुलीचा गौरव, सचिनचा अभिमान!

युद्धाच्या सावटात सोन्याची चमक फिकी!

नेमार खेळणार की बूट टांगणार?

अभिषेकच्या प्रतिमेच्या गैरवापरावर न्यायालयाचा दणका!

देवीदास कापसे बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. अखेर स्थानिक सरपंचांच्या मध्यस्थीने चार दिवसांनी त्यांची आरोपींच्या तावडीतून सुटका करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या अंगावर मारहाणीच्या गंभीर खुणा असल्याचेही सांगितले जात आहे.

या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. पीडिताच्या वृद्ध आईने मुलाच्या अपहरणाची तक्रार देण्यासाठी गेवराई पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र सुरुवातीला पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर मुख्य आरोपी मुकादम गणेश थोरात आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध अपहरण, बेकायदेशीर कैद, अमानुष मारहाण तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) कठोर गुन्हे दाखल करून तातडीने अटक करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version