हरियाणातील फरिदाबाद येथे पार्किंगच्या जागेवरून आणि पाळीव कुत्र्याच्या विष्ठेवरून झालेल्या वादातून एका वरिष्ठ आयटी अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. परमजीत धनखड असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून ते टेक महिंद्राच्या आशिया-पॅसिफिक विभागाचे माजी वरिष्ठ अधिकारी होते. सध्या ते व्हिएतनाममधील मुख्यालय असलेल्या एफपीटी सॉफ्टवेअर कंपनीत वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. या प्रकरणातील आरोपी शेजारी मोनू शर्मा हा गोळीबारानंतर कुटुंबासह फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ही घटना शुक्रवारी (६ नोव्हेंबर) रात्री फरिदाबादमधील सेक्टर २१ सी परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमजीत धनखड आणि आरोपी मोनू शर्मा यांची कुटुंबे एकाच चार मजली इमारतीत राहतात. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही कुटुंबांमध्ये वाहन पार्किंग आणि पाळीव कुत्र्याला पार्किंग परिसरात शौचास नेण्यावरून वाद सुरू होता. आरोपीच्या मुलाकडून पार्किंग परिसरात कुत्र्याला शौचास नेले जात असल्याने परमजीत यांच्या कुटुंबीयांनी अनेकदा आक्षेप घेतला होता. याच मुद्द्यावरून चार-पाच दिवसांपूर्वीही दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता.
शुक्रवारी रात्री परमजीत जिममधून घरी परतले. त्यावेळी त्यांच्या ठरवून दिलेल्या पार्किंगच्या जागेवर मोनू शर्माची गाडी उभी होती. परमजीत यांनी गाडी हटवण्यास सांगितल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपीने परवानाधारक पिस्तूलातून परमजीत यांच्यावर अंदाजे १५ गोळ्या झाडल्या. त्यापैकी नऊ गोळ्या त्यांना लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
हे ही वाचा:
व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी; ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांच्या हस्ते दीपप्रज्वलन
शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज
निवडणुकांपूर्वी पाकिस्तानचे ‘आप’ प्रेम? भगवंत मान यांना व्हिसा देण्याची तयारी
१० लाखांचे बक्षीस असलेला झारखंडचा नक्षलवादी ठाकुर्लीतून अटकेत
परमजीत हे कामानिमित्त सिंगापूरमध्ये राहत होते. ते ५ नोव्हेंबर रोजी भाच्याच्या लग्नासाठी भारतात परतले होते. २४ नोव्हेंबरला त्यांच्या भाच्याचे लग्न होणार होते. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथून रिकाम्या काडतुसांचे अवशेष जप्त करण्यात आले. परमजीत यांच्या मुलाच्या तक्रारीवरून सूरजकुंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या अटकेसाठी पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके शोधमोहीम राबवत आहेत.
