गुजरातमधील बनासकांठा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. देशात अफरातफर माजवून आपल्याला बदनाम करण्याचा काही लोकांचा डाव होता, असा आरोप त्यांनी केला. इराण आणि आखाती देशांभोवती तणावाचे वातावरण असताना देशात खतांच्या टंचाईबाबत अफवा पसरवून शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) बनासकांठा येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देशातील प्रत्येक शेतकरी आणि तरुण विकसित भारताच्या संकल्पासह पुढे जात आहे. मात्र, काही लोकांना देशाची प्रगती पाहवत नाही. देश अडचणीत असलेला पाहून त्यांना आनंद होतो. आखाती देशांतील तणावाचा सामना भारत एकजुटीने करत असताना काही जणांनी खतांच्या टंचाईबाबत अफवा पसरवल्या. देशात गोंधळ निर्माण करून मोदींना बदनाम करण्याचा त्यांचा हेतू होता.
खतांच्या उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांना आश्वस्त करताना त्यांनी जागतिक बाजारपेठेतील आणि भारतातील खतांच्या किमतींची तुलना केली. युद्धामुळे जगभरात खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. जगात युरियाची एक गोणी तीन हजार रुपयांना मिळत असताना भारतीय शेतकऱ्यांना ती ३०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळत आहे. तसेच, जगात डीएपी खताची गोणी पाच हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीला पोहोचली असताना भारतात ती १,३५० रुपयांना उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
राहुल गांधींच्या अराजकतेच्या राजकारणाविरोधात भाजपचा देशभरात एल्गार
प्रकृतीवर प्रश्न विचारताच ट्रम्प पत्रकारावर संतापले
नागपूर पदवीधर मतदार संघाने काँग्रेसची लाज राखली
जागतिक परिस्थितीमुळे खतांच्या किमती वाढल्या असल्या तरी त्याचा आर्थिक भार सरकारने शेतकऱ्यांवर पडू दिलेला नाही. शेतकरी सक्षम राहावा, यासाठी सरकार त्यांना मदत करत असल्याचे मोदी म्हणाले. दरम्यान, जनतेची सेवा हाच आपल्या सार्वजनिक जीवनाचा उद्देश असून, शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करत राहीन, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
