भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने रविवारी बीडब्ल्यूएफ सुपर ७५० स्पर्धेतील चायना मास्टर्स पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात सात्विक-चिराग यांनी चीनच्या जी तिंग आणि रेन शियांग यू यांच्या जोडीचा ११-२१, २१-१३, २१-१७ असा पराभव केला.
सात्विक-चिराग ही जोडी या स्पर्धेत २०२३ आणि २०२५ मध्ये उपविजेती ठरली होती. तर २०२४ मध्ये त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. गेल्या महिन्यात नवी दिल्ली येथे झालेल्या बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सात्विक-चिराग यांना आपले तिसरे पदक जिंकण्याची संधी हुकली होती. उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाल्यानंतर त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते.
बीडब्ल्यूएफ जागतिक दौऱ्यात या जोडीचे हे १०वे विजेतेपद आहे. यंदाच्या वर्षातील त्यांचे हे दुसरे सुपर ७५० विजेतेपद, तर एकूण चौथे विजेतेपद आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील विद्यमान पुरुष दुहेरीचे विजेते असलेले सात्विक-चिराग, २००५ मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर चायना मास्टर्स जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत. २०२६ मध्ये सात्विक आणि चिराग यांचा हा बीडब्ल्यूएफ जागतिक दौऱ्यातील तिसरा अंतिम सामना होता. मे महिन्यात ते थायलंड ओपनमध्ये उपविजेते ठरले होते आणि त्याच महिन्याच्या अखेरीस त्यांनी सिंगापूर ओपनचे विजेतेपद जिंकले होते.
हे ही वाचा:
बिहारमध्ये गंगा नदीचा रौद्रावतार
गरबा, दांडियात मुस्लिम नको…सगळ्यांनी टिळा लावा, आधार कार्ड तपासा!
पुण्यात हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा
२० वर्षांच्या तरुणाने एकट्याने बदललं नदीचं रूप
या सामन्यात जी तिंग आणि रेन शियांग यांनी शानदार सुरुवात करत ५-० अशी आघाडी घेत भारतीय जोडीवर दबाव निर्माण केला. सात्विक आणि चिराग यांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र मध्यंतराच्या वेळी चिनी खेळाडू ११-५ अशा आघाडीवर होते आणि त्यांनी सामन्यावर आपले वर्चस्व कायम ठेवले. अखेर त्यांनी १८ मिनिटांत पहिला गेम २१-११ असा जिंकला.
दुसऱ्या गेमची सुरुवातही अशाच प्रकारे झाली. चीनच्या जोडीने सुरुवातीला २-० अशी आघाडी घेतली. मात्र भारतीय जोडीने पुनरागमन करत स्कोअर ३-३ आणि ६-६ असा बरोबरीत आणला. त्यानंतर सात्विक आणि चिराग यांनी सामन्यावर नियंत्रण मिळवले आणि मध्यंतराच्या वेळी ११-७ अशी आघाडी घेतली.
काही जबरदस्त स्मॅशच्या जोरावर भारतीय जोडीने आपली आघाडी १७-११ अशी वाढवली. चिनी खेळाडूंनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय जोडीने तो हाणून पाडत २१-१३ असा गेम जिंकला आणि सामना निर्णायक गेममध्ये नेला. निर्णायक गेममध्ये चिनी खेळाडूंनी दमदार सुरुवात करत ४-० अशी आघाडी घेतली. भारतीय खेळाडूंनी पुनरागमन करत स्कोअर ७-७ असा बरोबरीत आणला आणि मध्यंतराच्या वेळी ११-९ अशी आघाडी मिळवली. यानंतर सात्विक-चिराग यांनी आपली आघाडी कायम ठेवली. त्यांनी संयमाने खेळ करत सलग चार गुण मिळवले आणि निर्णायक गेम २१-१७ असा जिंकला.
