मुंबईच्या कांदिवलीतील २३ वर्षीय प्रियांका योगेश पारेख हिने तिच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. कॅनडातील विनिपेग येथे झालेल्या कॉमनवेल्थ महिला इक्विप्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये प्रियांकाने तीन प्रकारांत एकूण ३४७.५ किलो वजन उचलत सुवर्णपदकावर नाव कोरले.
प्रियांका ही कांदिवलीतील पुष्पा पार्क परिसरातील रहिवासी आहे. तिच्या या यशानंतर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रियांकाच्या या यशाबद्दल कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर यांनी तिचे अभिनंदन केले. “कांदिवलीकर प्रियांका, आमचा अभिमान,” असे म्हणत त्यांनी प्रियांकाच्या सन्मानार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत तिचे कौतुक केले. तसेच तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कांदिवलीकर प्रियंका, आमचा अभिमान
कॅनडा येथे आयोजित कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावून देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या पुष्पा पार्क येथील निवासी प्रियांका योगेश पारेख हिचे आम्ही आज वाजत गाजत अभिनंदन केले. तिच्या कौतुकासाठी एक भव्य रॅली काढली. तिचा विजय… pic.twitter.com/61bPp8ht0e
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 30, 2026
प्रियांकाचा पॉवरलिफ्टिंगमधील प्रवासही विशेष आहे. २०२४ मध्ये बीकॉम आणि इंटिरियर डिझायनिंगच्या परीक्षांची तयारी करत असताना दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने तिला त्यापैकी एक परीक्षा सोडावी लागली. त्यानंतर उपलब्ध वेळेत तिने फिटनेससाठी जिममध्ये जाण्यास सुरुवात केली. जड वजन उचलण्याची आवड निर्माण झाल्यानंतर तिने पॉवरलिफ्टिंगचा सराव सुरू केला. ती दररोज सुमारे ४ तास सराव करत होती. याच मेहनतीच्या जोरावर ११ एप्रिल रोजी सांगली येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य क्लासिक चॅम्पियनशिपमध्ये तिने २९२.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर जूनमध्ये तेलंगणात झालेल्या राष्ट्रीय इक्विप्ड स्पर्धेत स्क्वॉटमध्ये रौप्य आणि बेंच प्रेसमध्ये सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत तिने एकूण ३४२.५ किलो वजन उचलले. या कामगिरीच्या जोरावर तिची राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड झाली.
हे ही वाचा:
एअर इंडियाला १० हजार कोटींच्या कर्जाची गरज
इंडी आघाडीच्या बैठकीकडे आप, डीएमकेची पाठ
आरबीआयच्या हस्तक्षेपामुळे रुपयाची घसरण थांबली
कॅनडातील विनिपेग येथे १७ ते २७ सप्टेंबरदरम्यान कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जगभरातील ७०० हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. प्रियांकाने २६ सप्टेंबर रोजी झालेल्या महिला इक्विप्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले.
