परस्पर संमतीने सुरू झालेल्या प्रेमसंबंधांचा शेवट झाला म्हणून पूर्वीचे शारीरिक संबंध बलात्कार ठरवता येणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. एखाद्या पुरुषाने प्रेमसंबंध संपवण्याचा निर्णय घेतला म्हणून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणे योग्य नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. विवाहाचे आश्वासन देऊन बलात्कार केल्याच्या आरोपाशी संबंधित प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने ही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली.
न्यायालयाने स्पष्ट केले की, प्रेमसंबंधांमध्ये दुरावा निर्माण झाल्यानंतर पूर्वीच्या संमतीने प्रस्थापित झालेल्या शारीरिक संबंधांना मागाहून गुन्ह्याचे स्वरूप देणे योग्य नाही. मात्र, सुरुवातीपासूनच विवाहाचे खोटे आश्वासन देऊन किंवा फसवणूक करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले असतील, तर अशा प्रकरणाचे स्वरूप वेगळे असेल. त्यामुळे प्रत्येक प्रकरणातील परिस्थिती, पुरावे आणि संबंधांचे स्वरूप तपासणे आवश्यक आहे.
हे ही वाचा:
सोमनाथ मंदिर परिसरातील मांसाहार विक्रीवरील बंदी रद्द
विजय मल्ल्या ‘फ्रॉड’ नव्हता, त्याला देश सोडायला भाग पाडले
राफेल मरीनची ‘आयएनएस विक्रांत’वर पहिल्याच प्रयत्नात यशस्वी लँडिंग
या सुनावणीदरम्यान न्यायालयाने पुरुषाच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा मुद्दाही उपस्थित केला. एखाद्या व्यक्तीला प्रेमसंबंधातून बाहेर पडण्याचा अधिकार आहे. केवळ भविष्यात बलात्काराचा आरोप होण्याच्या भीतीने पुरुषाला आयुष्यभर एखाद्या नात्यात राहण्यास भाग पाडता येणार नाही. असे करणे म्हणजे त्याचे निर्णयस्वातंत्र्य हिरावून घेण्यासारखे आहे, असे न्यायालयाने नमूद केले.
दरम्यान, बलात्कार हा महिलांच्या प्रतिष्ठेवर आणि शारीरिक स्वातंत्र्यावर गंभीर आघात करणारा गुन्हा असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले. खऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई झालीच पाहिजे; मात्र प्रेमसंबंधांमधील अपयशाचा राग किंवा वैयक्तिक वादातून कायद्याचा गैरवापर होता कामा नये. महिला अत्याचाराच्या तक्रारींचे गांभीर्य कायम राखतानाच निरपराध व्यक्तींना खोट्या आरोपांपासून संरक्षण मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असा संदेश या निकालातून देण्यात आला आहे.
