राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. खासदार सुप्रिया सुळे याही यावेळी उपस्थित होत्या. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची प्रकृती आता उत्तम असल्याची माहिती दिली. डॉक्टरांशी आपली चर्चा झाली असून, पवार यांना उद्याच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
अजित पवार असते तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असत्या
भारताचा हॉकीत विक्रमी सहावा आशियाई मुकुट!
भारताशी भिडण्याआधीच कॉनवे मालिकेबाहेर!
घर खरेदीसाठी बंगळुरू, मुंबई आणि पुण्याला सर्वाधिक पसंती
या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, शरद पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. राजकारणापलीकडेही माणुसकीची नाती असतात. पवार साहेबांशी आपले कौटुंबिक संबंध असून, काही अडचण किंवा प्रश्न असल्यास ते आपल्याला फोन करतात. त्यामुळे रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणे हे आपले कर्तव्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, रुग्णालयात असतानाही शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले. विशेषतः सातारा जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीबाबत पवार यांनी चौकशी केली. दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर असतानाच त्यांना संसर्गाचा त्रास सुरू झाला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, लवकरच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येण्याची शक्यता आहे.
