घरविशेषनाशिकमध्ये गोदावरीला मोसमातील सर्वात मोठा पूर

नाशिकमध्ये गोदावरीला मोसमातील सर्वात मोठा पूर

प्रशासनाचा हाय अलर्ट

नाशिक आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा पूर आला असून शहरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. रामकुंड परिसर, रामसेतू पूल तसेच दुतोंड्या मारुती मंदिरापर्यंत पुराचे पाणी पोहोचल्याने नदीकाठावरील अनेक भाग जलमय झाले आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संध्याकाळपर्यंत नदीची पाणीपातळी धोक्याच्या पातळीवर जाण्याची शक्यता व्यक्त करत नागरिकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

सध्या गंगापूर धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून सुमारे १३ हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. कश्यपी आणि गौतमी गोदावरी धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने होळकर पुलाजवळील पाण्याचा प्रवाह २४ हजार क्यूसेकपर्यंत पोहोचण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. गोदावरी नदी साधारण १९ हजार क्यूसेक विसर्गानंतर धोक्याची पातळी ओलांडते. त्यामुळे सराफ बाजार, भांडी बाजार आणि नदीकाठावरील सखल भागात पाणी शिरण्याचा धोका वाढला असून प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
हे ही वाचा:
महिला आंदोलकाला थप्पड मारणे भोवले

कॉक्रोच जनता पार्टीचे २४ जुलै रोजी देशव्यापी आंदोलन

तीन दिवसांच्या तेजीला ब्रेक! सोनं स्वस्त

कॉन्स्टेबलची हत्या…अनंतनागमध्ये लष्करच्या दोन दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, गंगापूर धरणातून सोडलेले पाणी रामकुंड परिसरात पोहोचण्यासाठी सुमारे पाच तास लागतात. त्यामुळे संध्याकाळनंतर पुराची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. नदीकाठावरील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची तयारी करण्यात आली असून पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी करू नये, नदीपात्रात उतरू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, त्र्यंबकेश्वर परिसरात गेल्या २४ तासांत १९४ मिमी पावसाची नोंद झाली असून धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला असून पुढील काही तास नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version