घरविशेषभारताला बनवूया इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीचे ‘नवीन आणि विश्वासार्ह ठिकाण’!

भारताला बनवूया इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीचे ‘नवीन आणि विश्वासार्ह ठिकाण’!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आवाहन

भारताला इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीसाठी “नवीन आणि विश्वासार्ह ठिकाण” म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेमीकॉन इंडियाचे उद्घाटन करताना केला. जागतिक चिप उत्पादकांनी भारताच्या क्षमतेचा विचार करावा आणि पुरवठा साखळीचा शस्त्र म्हणून उपयोग करण्यापासून इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला मुक्त करण्यासाठी भारताची भूमिका लक्षात घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

सेमिकॉन इंडिया २०२६चे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सेमीकंडक्टर हे केवळ कारखाना उभारून काम पूर्ण होणारे क्षेत्र नाही. जगातील ज्या देशांमध्ये सेमीकंडक्टरची मजबूत परिसंस्था उभी राहिली, तिथे त्यासाठी अनेक दशकांचे प्रयत्न झाले आहेत. मात्र भारताने जागतिक भागीदारांच्या सहकार्याने चिप डिझाइन, उत्पादन, उपकरण निर्मिती, कच्च्या मालाची परिसंस्था, चाचणी क्षमता अशा विविध क्षेत्रांमध्ये एकाच वेळी काम केले असून त्यातून यशही मिळवले आहे.

पंतप्रधान मोदींच्या या भाषणाच्या काही दिवस आधी इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या दुसऱ्या टप्प्याला अधिसूचित करण्यात आले असून त्यासाठी ₹१.२७ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मोदी म्हणाले की, भारत हा “लोकशाहीची जननी” आहे. अशा देशाने एखाद्या महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक उद्योगात यश मिळवले, तर त्याचा फायदा केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या पुरवठा साखळीला होतो. सध्याच्या काळात पुरवठा साखळ्यांचा वापर दबाव निर्माण करण्यासाठी केला जात असल्याने भारतात सेमीकंडक्टर परिसंस्था विकसित होण्याचे महत्त्व आणखी वाढते.

हे ही वाचा:

टाटा समूहात अंतर्गत संघर्ष पुन्हा उघड

दिल्लीमध्ये १७ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर हत्या

मूडीजने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज ७ टक्क्यांवर नेला

नवोदयवरून तामिळनाडूला सर्वोच्च न्यायालयाचा दणका!

कार्यक्रमात केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सरकारचे उद्दिष्ट एक लाख लोकांना प्रशिक्षण देण्याचे आहे. भारतात उभारल्या जात असलेल्या सेमीकंडक्टर कारखान्यांमध्ये थेट काम करता येईल आणि जागतिक पातळीवरही उपयोगी ठरेल, अशी कौशल्यसंपन्न मनुष्यबळाची निर्मिती करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

वैष्णव यांनी सांगितले की, सेमिकॉन २.०च्या पुढील टप्प्यात भारतात चिप डिझाइन करणाऱ्या किमान २०० स्टार्टअप्स आणि कंपन्या उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. भारतीय चिप डिझाइन कंपन्यांची जागतिक उद्योगात आधीपासूनच उपस्थिती आहे. चिप डिझाइनसाठी मोठ्या प्रमाणावर स्वतःची उत्पादन क्षमता असणे आवश्यक नसल्याने या क्षेत्रात भारताला मोठी संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारत ‘चीप ग्राहक’ ते जागतिक केंद्र

कार्यक्रमातील चर्चेतून भारताची भूमिका केवळ चिप्सचा मोठा ग्राहक आणि चिप डिझाइनचे केंद्र अशी न राहता संपूर्ण सेमीकंडक्टर परिसंस्था असलेले जागतिक केंद्र बनण्याच्या दिशेने असल्याचे चित्र समोर आले. चिप डिझाइन, उत्पादन, उपकरणे, सामग्री, संशोधन-विकास, चाचणी, पॅकेजिंग आणि पुरवठा साखळी या सर्व क्षेत्रांना एकत्रितपणे विकसित करण्यावर सरकारचा भर आहे. पंतप्रधान मोदी यांनीही याच व्यापक दृष्टिकोनातून भारताला जागतिक कंपन्यांसाठी विश्वासार्ह आणि सुरक्षित इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती केंद्र म्हणून विकसित करण्याचे आवाहन केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version