घरबिजनेससोन्याच्या तस्करांवर डीआरआयचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

सोन्याच्या तस्करांवर डीआरआयचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

४२ किलो सोनं, १० किलो चांदी जप्त

- Advertisement -

भारताने १३ मे २०२६ पासून सोन्यावरील प्रभावी आयात शुल्क ६ टक्क्यांवरून १५ टक्के केल्याने कायदेशीर मार्गाने आयात होणारे सोने महागले आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर ऐतिहासिक उच्चांकाजवळ असल्याने तस्करीला पुन्हा वेग आल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात डीआरआयने देशभरात विदेशी सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी मोहीम राबवत ४२ किलोहून अधिक विदेशी सोने आणि सुमारे १० किलो चांदी जप्त केली आहे. जप्त केलेल्या मौल्यवान धातूंची एकूण किंमत ६५ कोटी रुपयांपेक्षा जास्त असून, या कारवायांमध्ये २५ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पाच परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. तस्करांकडून सोनं लपवण्यासाठी वाहनांमध्ये गुप्त कप्पे, शरीरातील विशेष पद्धती, विमानतळावरील ट्रान्झिट प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा वापर, तसेच जमीन आणि समुद्रमार्ग अशा वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या जात असल्याचे तपासातून समोर आले आहे.
हे ही वाचा:
चाइना मास्टर्समध्ये श्रीकांतचा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश

‘झोरावर’ टँक ते हरित अमोनिया; भारत-बेल्जियम भागीदारीचे नवे पर्व

कोलकात्यात हॉटेलांच्या किचनमध्ये सडलेले मांस, मिठाईत गुलाल

पेपालने भारतातून ६०० कर्मचाऱ्याना केलं कमी

मुंबई विमानतळावर २८ आणि २९ ऑगस्ट रोजी झालेल्या कारवाईत तस्करीचे मोठे रॅकेट उघड झाले. दुबई, बँकॉक आणि मालेहून मुंबईमार्गे येणाऱ्या परदेशी नागरिकांचा वापर तस्करीसाठी केला जात होता. विमानतळावरील एका कर्मचाऱ्याचाही या नेटवर्कमध्ये सहभाग असल्याचे समोर आले. डीआरआयने १६ कॅप्सूलमधून तब्बल ६ किलो ८५० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची पावडर मेणाच्या स्वरूपात जप्त केली. या प्रकरणात सहा जणांना अटक झाली. कोलकात्यातही दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांच्या अंतर्वस्त्र आणि जीन्समध्ये लपवलेली ४ किलो ८७० ग्रॅम सोन्याची पेस्ट, तर बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून ३ किलो ३६० ग्रॅम सोन्याच्या ११ कच्च्या साखळ्या जप्त करण्यात आल्या. पश्चिम बंगालच्या नादियामध्ये एका महिलेच्या घरातून १५ किलो ६१० ग्रॅम वजनाच्या १२५ विदेशी सोन्याच्या लगड्या जप्त करण्यात आल्या.

केरळमध्ये कोची आणि कालीकट विमानतळावर अनुक्रमे १ किलो ७८० ग्रॅम आणि ५४९ ग्रॅम सोने जप्त झाले. भारत-बांगलादेश सीमेवरही वेगवेगळ्या कारवायांमध्ये विदेशी सोने पकडण्यात आले. कोलकात्यात शरीरात लपवलेल्या कॅप्सूलमधून १ किलो ४८० ग्रॅम सोने जप्त झाले, तर गुवाहाटीत ३ किलो ८४० ग्रॅम सोन्याच्या लगड्या हस्तगत करण्यात आल्या. तामिळनाडूतील रामनाथपुरममध्ये श्रीलंकेहून समुद्रमार्गे आणलेले १ किलो ३६० ग्रॅम सोने आणि ९ किलो ९९० ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली. डीआरआयच्या या सलग कारवायांमुळे विमानतळ, सीमा, रस्ते आणि समुद्रमार्गाने चालणाऱ्या संघटित तस्करी नेटवर्कला मोठा धक्का बसला असून, सोन्याच्या तस्करीची देशभरातील साखळी किती व्यापक आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version