मुंबई दुग्ध उत्पादक संघाने मुंबईतील सुट्या म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ सप्टेंबर २०२६ पासून सध्या ९३ रुपये प्रतिलिटर असलेला सुट्या दुधाचा घाऊक दर थेट १०२ रुपये होणार आहे. हे नवे दर २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत लागू राहणार आहेत. सणासुदीच्या तोंडावर झालेल्या या दरवाढीमुळे मुंबईकरांच्या घरगुती बजेटवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
दुधाळ जनावरांच्या वाढलेल्या किमती तसेच पशुखाद्य, चारा आणि पेंड यांच्या वाढत्या दरामुळे दूध उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दाणा, तूरचुणी आणि चणाचुणी यांसारख्या पशुखाद्यांच्या दरात तब्बल २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे उत्पादकांकडून सांगण्यात आले आहे. वाढत्या खर्चाच्या तुलनेत सध्याचा दूध दर अपुरा पडत असल्याने उत्पादकांवरील आर्थिक ताण वाढला होता.
हे ही वाचा:
तिबेटमध्ये नेपाळ सीमेजवळ आणखी एक तलाव फुटला; पुन्हा महापुराचा धोका
आठ सिमकार्ड पाकिस्तानात पाठवणारे दाम्पत्य अटकेत
नेपाळमध्ये महापुराचं थैमान; मृतांचा आकडा ४६९ वर
या पार्श्वभूमीवर मुंबई दुग्ध उत्पादक संघाच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. उत्पादन खर्चात झालेली वाढ भरून काढण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे संघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, प्रतिलिटर ९ रुपयांच्या वाढीचा थेट भार आता ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे.
विशेष म्हणजे, सणासुदीच्या काळात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे सुट्या दुधाच्या दरवाढीचा परिणाम पुढे दही, ताक, मिठाई आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या किमतींवरही होण्याची शक्यता आहे. आधीच महागाईचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना सप्टेंबरच्या सुरुवातीलाच दूध दरवाढीचा अतिरिक्त आर्थिक फटका बसणार आहे.
