घरसंपादकीयहात हलवत परतली ट्रम्पवाली मुनिया!

हात हलवत परतली ट्रम्पवाली मुनिया!

- Advertisement -

ट्रम्प नेमके कोणासोबत वाटाघाटी करतायत परमेश्वरालाच ठाऊक. युद्धबंदीची घोषणा त्यांनी केली. वाटाघाटी यशस्वी झाल्याची घोषणा त्यांनी केली. जगाने साशंक सुस्कारा सोडला. आपली मध्यस्ती यशस्वी ठरली आता इराण, आखाती देश आणि अमेरिकेकडून मोठी भीक मिळेल असा विचार करून पाकिस्तानचे नेत खूष झाले. तेवढ्यात ट्रम्प खोटं बोलतायत, इराणने युरेनियम सोपवण्याचे अजिबात मान्य केलेले नाही, असा खुलासा करत इराणने पुन्हा होर्मुझमध्ये नाकाबंदी केली. हे सतत होते आहे. त्यामुळे एक सवाल निर्माण झाला आहे की, ट्रम्प नेमके कोणासोबत वाटाघाटी करीत आहेत? आणि कशाला?

युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांच्यावर मोठा दबाव आहे. हा दबाव पक्षांतर्गत आहे, अमेरिकी जनतेचा आहे. ही युद्धबंदी झाली नाही, युद्ध अधिक चिघळले तर येत्या मध्यावधी निवडणुकांमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाची तिरडी उचलली जाणार हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्यासाठी ही युद्धबंदी आवश्यक आहे. जेणे करून ते किमान त्यांची चार वर्षांची टर्म पूर्ण करतील. युद्धबंदी घडावी आणि ती आपल्या शर्तींवर घडावी म्हणून ट्रम्प यांनी दोन पोस्टमन कामाला लावले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि पडेल फिल्ड मार्शल असीम मुनीर. शाहबाज कतार, सौदी अरेबिया, तुर्कीयाशी चर्चा करतायत. मुनीर तीन दिवसांच्या इऱाण दौऱ्यावर होते. ट्रम्प यांचा निरोप घेऊन ते तिथे गेले होते. शनिवारी ते हात हलवत परतले. कुत्ता सुंघने आया था, असा डायलॉग सरफरोश या सिनेमात आहे. मुनीर त्याच मोहीमेवर होते.

पाकिस्तान अमेरिकेच्या बाजूने ही युद्धबंदी व्हावी यासाठी ताकदीने प्रयत्न करतो आहे. कारण शाहबाज, मुनीर हे ट्रम्प यांचे बिटकॉईनच्या धंद्यातील पार्टनर बनले आहेत. पाकिस्तानने इस्त्रायला मान्यता दिलेली नसली, तरी स्टीव्ह व्हीटकॉफ, ट्रम्प यांचा जावई जरेड कुशनर हे यहुदी मुनीर आणि शाहबाज यांच्या खांद्याला खांदा लावून धंदा करतात.
ट्रम्प यांच्यासाठी हे चंगूमंगू घाम गाळत असल्यामुळे अमेरिकाही त्यांची काळजी घेत असते. भिकेला लागलेल्या पाकिस्तानला आयएमएफने २८ मार्च रोजी १.२ अब्ज डॉलर्सच्या कर्जाचा ताजा डोस दिलेला आहे. इराणला हे सगळे दिसते आहे. अमेरिकेसोबत इराणचे नेते पाकिस्तानबाबतही अति सावध आहेत. इराण भेटीत राष्ट्राध्यक्ष मसूद पजशेकीयान यांची विधाने ऐकली तर हे लक्षात येऊ शकते.

हे ही वाचा:

तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १० जणांचा मृत्यू

ट्रम्पचा इराणला कडक इशारा

सॅटेलाइट फोन सापडल्याने दोन अमेरिकन नागरिक ताब्यात

इटलीत दोन भारतीयांची गोळ्या झाडून हत्या

ट्रम्प हे बोलघेवडे आहेत. ‘आम्ही महाकाय यंत्रे घेऊन इराणमध्ये जाणार आहोत, युरेनियम बाहेर काढणार आहोत. ते अमेरिकेत आणणार आहोत. यासाठी कोणतीही रक्कम दिली गेली नाही.’ रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना ट्रम्प यांनी ही विधाने केलेली आहेत. ट्रम्प यांनी युरेनियमचा उल्लेख न्यूक्लिअर डस्ट असा केला आहे. इराणच्या परराष्ट मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी मात्र ही लोणकढी थाप असल्याचे सांगितले. ‘आमचे युरेनियम कुठेही जाणार नाही, युरेनियम समृद्ध करणे हा सौर्वभौम देश म्हणून आमचा हक्क आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे’.

दोन्ही पक्षांच्या भूमिकेत फरक आहे. ट्रम्प एकाच पोस्टमध्ये होर्मुझ खुले झाल्याची घोषणा करतात. त्याच पोस्टमध्ये इराणच्या जहाजांची मात्र नाकेबंदी सुरू राहील अशी घोषणा करतात. अशा अनेक एकतर्फी घोषणांनंतर ट्रम्प स्वत: सोमवारी इस्लामाबादला जाणार अशा बातम्या पसरल्या. बडी आसामी देशात आल्यानंतर मोकळ्या हाताने येत नाही, त्यामुळे काही तरी पदरात पडेल अशा अपेक्षेने मुनीर, शाहबाज खूष होते. परंतु प्रत्यक्षात हे घडण्याची शक्यता कमी आहे.

ट्रम्प काही तासांच्या अंतराने अशा दोन घोषणा करू शकतात, ज्या परस्पर विरोधी आहेत. इराणची सभ्यता नष्ट करू अशी घोषणा रात्री करायची पहाटे, इराणसोबत युद्धबंदी झाली अशी घोषणा करायची. आज एक आणि उद्या एक. परस्पर विरोधी घोषणांमुळे शेअर बाजारात उतार चढाव होतात. तेलाच्या किंमती खालीवर उसळी घेतात. ट्रम्प आणि त्यांचे व्यापारी मित्र आधीच ठरल्याप्रमाणे बाजारात सौदे करून प्रचंड पैसा कमावतात, हा आरोप तर आता खुलेआम होतो आहे. ट्रम्प हे खोटारडे आहेत, मनोरुग्ण आहेत, असे आरोप, यापूर्वी त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी केले आहेत. ट्रम्प प्रचंड थापा मारतात, याचा अनुभव भारतानेही घेतला आहे. ट्रम्प थापा ही सर्वमान्य बाब असली तरी वाटाघाटींचे गुऱ्हाळ सुरू आहे.

हे खरे असले तरी एक शक्यता आणखी आहे. ती म्हणजे ट्रम्प ज्यांच्यासोबत वाटाघाटी करतायत ते वेगळे नेते आहेत. युद्ध कऱणारे आयआरजीसीचे कमांडर वेगळे आहेत. ३१ जिल्ह्यात ३१ कमांडर. यांचा आपसांत काही समन्वय असण्याची शक्यता कमी आहे. ते वाटाघाटी करण्याऱ्या नेत्यांच्या संपर्कात असतील हे ठामपणे सांगता येत नाही. वाटाघाटी करणाऱ्या नेत्यांचे जर युद्ध करणाऱ्या कमांडरशी संपर्क, संवाद आणि नियंत्रण नसले तर युद्धबंदी यशस्वी होणार कशी ?

इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फथाली यांनी भारत हा खास मित्र असल्याचा दावा वारंवार केला आहे. नाकाबंदीच्या काळात इराणने ज्या ५ देशांच्या जहाजांना होर्मुझमधून येजा करण्यास परवानगी दिली होती, त्यात भारताचाही समावेश आहे. तरीही भारताच्या जग अन्नपूर्णा आणि सन्मार हेराल्ड या दोन जहाजांवर इराणच्या दोन जहाजांवर इराणच्या बोटींनीने हल्ला चढवला. यापैकी अन्नपूर्णावर दोन दशलक्ष बॅरल तेल होते.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे याप्रकरणी इराणच्या राजदूतांना बोलावून समज दिली आहे. इराणच्या हल्ल्यात आपल्या व्यापारी जहाजांचे कोणतेही नुकसान झाले नाही, सगळे प्रवासी सुरक्षित आहे. परंतु जे घडले त्याचा अर्थ असा निघतो की, सुंदोपसुंदी माजली आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. आयआरजीसीवर कोणाचेही नियंत्रण नाही.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागछी यांनी होर्मुझ खुले झाल्याची पोस्ट काही दिवसांपूर्वी केली. काही वेळातच आयआरजीसीशी संबंधित ट्वीटर हॅण्डलवर पोस्ट आली की, ‘आम्ही आमच्या नेत्याच्या हुकूमानुसार होर्मुझची नाकाबंदी उठवू, एखाद्या येडपटाच्या पोस्टमुळे नाही’. अरागछी इस्लामाबादेत झालेल्या वाटाघाटीत सहभागी होते. तरीही त्यांना वेडपट ठरवण्यात आले. वाटाघाटीत सहभागी असलेले आयआरजीसीच्या मतानुसार येटपट आहेत आणि युद्धबंदी त्यांना मान्य नाही. आयआऱजीसीचे कमांडर ज्या सुप्रीम नेत्याबद्दल बोलतायत, तो मात्र वाटाघाटींपासून दूर आहे.

ट्रम्प यांनी लादलेल्या अटी मान्य करणे इराणच्या सुपर काऊंसिलसाठी अशक्यकोटीतील बाब आहेत. तरीही युद्धबंदी झाली तर तो चमत्कार असेल. वाटाघाटी आणि कोंडी एकत्रित होऊ शकत नाही. तुम्ही होर्मुझ खुली करा आम्ही मात्र तुमची जहाजे रोखणारा हा ट्रम्प यांचा पवित्रा आहे. हे इराणकडून मान्य कसे होईल? दोघांनी एकमेकांची मानगुट पकडलेली आहे. ‘तु माझी मानगुट सोड, परंतु मी मात्र तुझी सोडणार नाही’, हा ट्रम्प यांचा पवित्रा आहे. तो मान्य कसा होईल? तरीही वाटाघाटी केल्या जात आहेत. ट्रम्प इस्लामाबादेत येणार, वाटाघाटीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार, अशी आवई उठवली जाते.

मुनीर तीन दिवस इराणमध्ये मुक्काम ठोकतात. इराणच्या नेत्यांसोबत वाटाघाटी करतात. त्यांच्या भेटी दरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पजशिकीयान यांचे विधान येते. ‘सतत भूमिका बदलल्यामुळे आमचा अमेरिकेवर विश्वास नाही, इराणला आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत न्याय हवा आहे.’ अर्थ स्पष्ट आहे. अमेरिकेचा न्याय इराणला मान्य नाही.

अमेरिकेच्या पाळीव मुनीर याच्या समोर पजशेकियान यांनी खडे बोल सुनावलेले आहेत. ते जे म्हणाले त्याचा अर्थ असा आहे की, ‘अमेरिकेवर विश्वास उरलेला नाही’. जर विश्वास नसेल तर वाटाघाटी यशस्वी कशा होतील ? तरी ही ट्रम्प वाटाघाटी करतायत याची दोन कारणे असू शकतील. ट्रम्प यांना अधिक तयारीसाठी वेळ काढायचा आहे. त्यांना मोर्चेबांधणी मजबूत करायची आहे. इराणला बेसावध ठेऊन ठोकायचे आहे. ट्रम्प यांचा हेतू इराणला समजलेला आहे, हे पजशेकियान यांच्या विधानावरून बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. दोन्ही बाजूला अधिक ताकदीने प्रहार करण्याची तयारी सुरू आहे. इस्त्रायलने लेबेनॉनवर हल्ले सुरू केले आहेत. आखातात अमेरिकी सैनिकांची संख्या वाढते आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version