मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील गल्लोगल्ली पसरलेला बिस्किटांचा गोड सुगंध आता इतिहासजमा होणार आहे. अनेक दशकांपासून कार्यरत असलेला पार्ले प्रोडक्ट कंपनीचा जुना कारखाना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याठिकाणी लवकरच मोठा कमर्शिअल प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे अनेकांच्या आठवणींना उजाळा मिळत आहे.
पार्ले-जी, मोनॅको, क्रॅकजॅक यांसारखी उत्पादने केवळ खाण्याची वस्तू नव्हती, तर ती अनेक पिढ्यांच्या बालपणाचा भाग होती. विलेपार्लेतील हा कारखाना म्हणजे मुंबईच्या औद्योगिक इतिहासाचा एक महत्त्वाचा अध्याय मानला जातो. मात्र बदलत्या काळानुसार आणि शहरातील वाढत्या जागेच्या किमती लक्षात घेता, उत्पादन युनिट शहराबाहेर हलवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
हे ही वाचा :
मुक्त व्यापाराचा भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रावर काय होणार परिणाम?
अजित पवारांच्या विमानाचा अपघात; प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनाक्रम
राज्याच्या राजकारणातील ‘दादा’ व्यक्तिमत्त्व हरपले! कशी होती राजकीय कारकीर्द?
वडाळ्यात उभारली १५ फुटी तलवार; बिलाली फाउंडेशनचा उद्योग
मिळालेल्या माहितीनुसार, या कारखान्याच्या जागेवर अत्याधुनिक ऑफिस स्पेस, कॉर्पोरेट इमारती आणि व्यावसायिक संकुल उभारले जाणार आहे. मुंबईत कमर्शिअल स्पेसची मागणी सातत्याने वाढत असल्याने हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
स्थानिक रहिवाशांसाठी हा निर्णय संमिश्र भावना निर्माण करणारा आहे. एकीकडे जुन्या आठवणी आणि परिसराची ओळख असलेला कारखाना बंद होत असल्याची खंत आहे, तर दुसरीकडे नव्या प्रकल्पामुळे परिसराचा विकास होईल, सुविधा वाढतील अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. कारखाना बंद झाल्यामुळे आवाज आणि जड वाहतुकीचा त्रास कमी होईल, मात्र नव्या ऑफिस प्रकल्पामुळे गर्दी आणि ट्रॅफिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच, विलेपार्लेतील पार्लेचा कारखाना बंद होणे म्हणजे केवळ एका इमारतीचा शेवट नाही, तर मुंबईच्या एका गोड आठवणीला दिलेला निरोप आहे.
