ChatGPT ने आणले नवे हेल्थ फीचर

वैद्यकीय माहिती समजून घेण्यासाठी AI ची मदत

ChatGPT ने आणले नवे हेल्थ फीचर

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील आघाडीची संस्था OpenAI यांनी आपल्या लोकप्रिय ChatGPT साठी एक नवे हेल्थ फीचर सुरू केले आहे. या नव्या सुविधेमुळे वापरकर्ते आपली वैद्यकीय माहिती, तपासणी अहवाल आणि आरोग्याशी संबंधित नोंदी सुरक्षितपणे ChatGPT शी जोडू शकणार आहेत. आरोग्यविषयक माहिती समजून घेणे आणि डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी योग्य तयारी करणे हा या फीचरचा मुख्य उद्देश आहे.

या हेल्थ फीचरमध्ये वापरकर्ते इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड्स, विविध तपासण्यांचे अहवाल, औषधांची माहिती तसेच फिटनेस किंवा वेलनेस अ‍ॅप्समधील डेटा जोडू शकतात. या माहितीच्या आधारे ChatGPT वापरकर्त्यांना त्यांच्या आरोग्य अहवालांचा अर्थ सोप्या आणि समजण्यास सोप्या भाषेत सांगू शकतो. तसेच डॉक्टरांना कोणते प्रश्न विचारावेत, आहार कसा ठेवावा आणि जीवनशैलीत कोणते सामान्य बदल करता येतील याबाबतही मार्गदर्शन मिळणार आहे.

हे ही वाचा :
महिलेच्या मृत्यूनंतर अमेरिकेत संतापाची लाट

नोकरी शोधण्यासाठी भारतीय व्यावसायिक एआयचा वापर करणार

ममता बॅनर्जी का झाल्या अस्वस्थ?

जस्टिस यशवंत वर्मा याचिका : सुनावणी पूर्ण

OpenAI ने या फीचरमध्ये गोपनीयतेवर विशेष भर दिला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, हेल्थ फीचरमध्ये दिलेली वैयक्तिक आरोग्य माहिती ही इतर सामान्य चॅट्सपासून पूर्णपणे वेगळी ठेवली जाणार आहे. ही माहिती कोणत्याही प्रकारे AI मॉडेल ट्रेनिंगसाठी वापरली जाणार नाही. वापरकर्त्यांना कधीही आपला डेटा हटवण्याचा किंवा जोडलेली अ‍ॅप्स काढून टाकण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आला आहे. तसेच सर्व डेटा सुरक्षित एन्क्रिप्शन तंत्रज्ञानाद्वारे जपला जाणार आहे.

मात्र, OpenAI ने स्पष्टपणे सांगितले आहे की हे हेल्थ फीचर डॉक्टरांचा सल्ला किंवा वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही. ही सुविधा केवळ माहिती समजून घेण्यासाठी आणि आरोग्यविषयक तयारीसाठी वापरावी, असा सल्ला देण्यात आला आहे. सध्या हे फीचर मर्यादित वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असून, टप्प्याटप्प्याने अधिक लोकांसाठी ते सुरू करण्यात येणार आहे.

Exit mobile version