भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘कोअर सेक्टर’मध्ये फेब्रुवारी २०२६ महिन्यात मिश्र चित्र पाहायला मिळाले आहे. स्टील आणि सिमेंट या क्षेत्रांनी सकारात्मक वाढ कायम ठेवली असली, तरी एकूण वाढीचा वेग मंदावल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशातील आठ प्रमुख पायाभूत क्षेत्रांचा (कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खत, स्टील, सिमेंट आणि वीज) एकत्रित वाढदर फेब्रुवारीमध्ये सुमारे २.३ टक्क्यांवर आला आहे. जानेवारीमध्ये हा दर ४.७ टक्के होता. म्हणजेच एका महिन्यातच वाढीचा वेग लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.
हे ही वाचा:
अमेरिकेच्या सीआयएला भारताचा नेहले पे देहला
झोमॅटोने २.४० रुपयांनी वाढवले प्लॅटफॉर्म शुल्क
काबूलमधील रुग्णालयावरील पाकिस्तानच्या हल्ल्यावर जागतिक मानवाधिकार संघटनेकडून सवाल
या घसरणीमागे मुख्य कारण म्हणजे ऊर्जा क्षेत्रातील कमजोरी. विशेषतः वीज निर्मितीतील वाढ फक्त ०.५ टक्क्यांवर आली, जी जानेवारीतील ५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढीच्या तुलनेत खूपच कमी आहे. वीज क्षेत्राचा कोअर इंडेक्समध्ये मोठा वाटा असल्याने त्याचा थेट परिणाम एकूण वाढीवर झाला. त्याचबरोबर कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादनातही घट दिसून आली. कच्च्या तेलाचे उत्पादन सुमारे ५ टक्क्यांनी कमी झाले, तर नैसर्गिक वायू उत्पादनातही घट कायम राहिली. रिफायनरी उत्पादनातही थोडीशी घसरण नोंदवली गेली. त्यामुळे ऊर्जा संबंधित क्षेत्रे अजूनही दबावाखाली असल्याचे दिसते.
मात्र, या नकारात्मक चित्रात स्टील आणि सिमेंट क्षेत्रांनी दिलासा दिला आहे. स्टील उत्पादनात सुमारे ७.२ टक्के वाढ झाली, तर सिमेंट उत्पादनात ९.३ टक्के वाढ नोंदवली गेली. जरी ही वाढ जानेवारीच्या तुलनेत कमी असली, तरीही पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्रातील मागणी टिकून असल्याचे हे संकेत आहेत.
कोळसा आणि खत क्षेत्रातही मर्यादित का होईना, पण सकारात्मक वाढ दिसून आली आहे. यामुळे औद्योगिक उत्पादनात काही प्रमाणात स्थैर्य टिकून आहे. मात्र, एकूणच कोअर सेक्टरमधील मंदावलेली वाढ ही अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब मानली जात आहे.
विशेष म्हणजे, कोअर सेक्टरचा इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रॉडक्शन (IIP) मध्ये सुमारे ४० टक्के वाटा आहे. त्यामुळे या क्षेत्रातील बदलांचा थेट परिणाम औद्योगिक वाढ आणि एकूण अर्थव्यवस्थेवर होतो. तज्ञांच्या मते, देशांतर्गत मागणी स्थिर असली तरी जागतिक परिस्थिती, ऊर्जा पुरवठा आणि भू-राजकीय तणाव यांचा पुढील काळात या क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आगामी महिन्यांमध्ये कोअर सेक्टरची कामगिरी कशी राहते, यावर अर्थव्यवस्थेचा पुढील कल अवलंबून असेल.
