भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने आपल्या आंतरराष्ट्रीय सेवांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने येत्या २५ ऑक्टोबर २०२६ पासून लंडनच्या हीथ्रो विमानतळासाठीची थेट उड्डाण सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचबरोबर भाडेतत्त्वावर घेतलेल्या बोईंग ७८७-९ वाइड-बॉडी विमानांचे संचालनही बंद करण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर वाढलेला भूराजकीय तणाव, काही हवाई मार्गांवरील निर्बंध, वाढलेला इंधन खर्च आणि ऑपरेशनल अडचणी या पार्श्वभूमीवर कंपनीने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
इंडिगोने गेल्या वर्षी नॉर्स अटलांटिक एअरवेजकडून बोईंग ७८७-९ विमाने भाडेतत्त्वावर घेऊन युरोपमधील लांब पल्ल्याच्या उड्डाणांना सुरुवात केली होती. या विमानांच्या मदतीने लंडनसह काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मार्गांवर सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र बदलत्या जागतिक परिस्थितीमुळे या विमानांचे संचालन अपेक्षेपेक्षा अधिक खर्चिक आणि आव्हानात्मक ठरत असल्याने कंपनीने हा करार नियोजित वेळेनुसार ऑक्टोबरअखेर समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा:
अभिजीतच्या कुटुंबाच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी
जहाजबांधणीचा प्रयोग नवा; भारताच्या शिडात प्रगतीची हवा
पावसाळ्यात अंडी खाण्याची सवय ठरू शकते आरोग्यासाठी फायदेशीर
लंडन हीथ्रो मार्गावरील सेवा थांबवली जाणार असली, तरी इंडिगोने आंतरराष्ट्रीय विस्ताराची योजना मागे घेतलेली नाही. कंपनीकडे लवकरच अत्याधुनिक एअरबस A350 वाइड-बॉडी विमाने दाखल होणार असून, ती सेवेत आल्यानंतर युरोपसह इतर लांब पल्ल्याच्या मार्गांवरील उड्डाणे अधिक सक्षमपणे सुरू करण्याची तयारी कंपनी करत आहे. तसेच काही आंतरराष्ट्रीय मार्गांवर एअरबस A321XLR विमानांद्वारे सेवा सुरूच राहणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, लंडन हीथ्रो उड्डाणांसाठी आधीच तिकीट बुक केलेल्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी इंडिगोकडून पर्यायी उड्डाणांची व्यवस्था किंवा संपूर्ण तिकीट रक्कम परत देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. हा निर्णय तात्पुरता असून, भविष्यात नव्या वाइड-बॉडी ताफ्याच्या जोरावर जागतिक बाजारपेठेत अधिक आक्रमक विस्तार करण्याचा कंपनीचा मानस असल्याचे इंडिगोने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
