मुंबई- बोरिवली परिसरात सुमारे ६ कोटी ८० लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी उघडकीस आली आहे. येथील एका ज्वेलरी दुकानात काम करणाऱ्या दोन सेल्समननीच सोन्या-चांदीचे दागिने, हिरे आणि चांदीचे बार घेऊन पळ काढल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी एमएचबी कॉलनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
बोरिवलीतील चिकूवाडी परिसरात राहणारे राकेश पोरवाल यांचे ‘माय गोल्ड पॉईंट’ नावाचे ज्वेलरी दुकान आहे. या दुकानात प्रभू सिंह आणि नारायण सिंह (दोघेही राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील कवरईया गावचे रहिवासी) हे सेल्समन म्हणून कार्यरत होते. रोजच्या व्यवहारानंतर दुकानातील दागिने दुकानातील एका खोलीत असलेल्या दोन लोखंडी तिजोर्यांमध्ये ठेवण्याची जबाबदारी या दोघांकडे होती. तसेच ते दोघे रात्री दुकानातच थांबत असत.
हे ही वाचा:
डिजीटल अरेस्टची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकांना ४० लाखांना लुटले
इराणच्या आंदोलनामध्ये ५,००० लोकांचा मृत्यू
झारखंडमधील भीषण अपघातात ५ ठार, २५ जखमी
भाजपाचे नेते राज पुरोहित यांचे निधन
मंगळवारी रात्री उशिरा एक ग्राहक आल्याने दागिने तिजोरीत ठेवण्यास उशीर झाला. त्यानंतर पोरवाल यांनी दोघांना दागिने सुरक्षित ठेवण्याचे निर्देश देऊन घरी गेले. बुधवारी पोरवाल वैयक्तिक कामासाठी डहाणू येथे गेले असताना एका महिला ग्राहकाचा फोन आला. दुकान बंद असून बाहेरून कुलूप लावले असल्याचे तिने सांगितल्याने पोरवाल यांना संशय आला.
पोरवाल यांनी दोन्ही सेल्समनना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाईल बंद आढळले. तातडीने बोरिवलीत परतल्यानंतर दुकानाचे शटर बंद असून बाहेरून कुलूप लावलेले, तसेच चावी कुलूपातच असल्याचे दिसून आले. आत तपासणी केली असता दोन्ही तिजोर्या उघड्या असून ६ कोटी ७९ लाख ८५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, हिऱ्यांचे दागिने आणि चांदीचे बार चोरीला गेल्याचे उघड झाले.
या घटनेनंतर एमएचबी कॉलनी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात आरोपी चोरीनंतर फरार झाल्याचे निष्पन्न झाले असून ते राजस्थानमध्ये त्यांच्या मूळ गावी पळून गेल्याचा संशय आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस व गुन्हे शाखेची दोन पथके राजस्थानकडे रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास सुरू आहे.
