रंगांचा सण असलेल्या होळीच्या दिवशी शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस आणि वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १६,७२७ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून सुमारे २ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मद्यपी वाहनचालकांवर पोलिसांची नजर
होळीच्या उत्साहात मद्यपान करून गाड्या चालवणाऱ्यांमुळे अपघात होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी ‘नाकाबंदी’ केली होती. प्रमुख चौक, महामार्ग आणि संवेदनशील ठिकाणांवर तपासणी कडक करण्यात आली होती. या मोहिमेत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या १५९ चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाहतूक पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, नियमांच्या उल्लंघनात हेल्मेटशिवाय गाडी चालवणे हे पहिल्या क्रमांकावर राहिले.
- विना हेल्मेट: ४,३१७ गुन्हे दाखल (दंड: ४२.९७ लाख रुपये)
- वेग मर्यादा ओलांडणे: ४,४८६ वाहनचालकांवर कारवाई
- वाहतुकीस अडथळा: २,५३२ गुन्हे नोंदवण्यात आले.
शहरातील वाहतूक प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी ही विशेष मोहीम राबवली होती. पोलिसांच्या या कडक कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
हे ही वाचा:
मोजतबा खामेनी इराणचे नवे सर्वोच्च नेते!
इराणच्या नतान्झ अणुस्थळाला नुकसान!
