मुंबई : बीसीसीआय (Board of Control for Cricket in India) च्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) सामन्यांच्या प्रसारणासाठी मुंबईत आलेल्या ब्रिटिश ब्रॉडकास्ट इंजिनियरचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जान विल्यम लँगफर्ड (वय ७६) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते यूकेचे नागरिक होते.
लँगफर्ड हे दक्षिण मुंबईतील हॉटेल ट्रायडेंट येथे २४ मार्चपासून वास्तव्यास होते. २९ मार्चच्या रात्री काम आटोपून ते त्यांच्या खोलीत (क्र. २७१५) परतले होते. मात्र, ३० मार्चच्या सकाळी हॉटेल कर्मचाऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
यानंतर मास्टर कीच्या सहाय्याने खोली उघडण्यात आली असता लँगफर्ड हे बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर आढळले. तातडीने हॉटेलमधील डॉक्टरांना पाचारण करण्यात आले आणि त्यांना बॉम्बे रुग्णालय येथे हलविण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद (ADR) करण्यात आली असून प्राथमिक तपासात कोणताही घातपाताचा संशय नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
