दुबईत लपलेला ड्रग्ज किंगपिन वीरेंद्र सिंग बसोया भारताच्या ताब्यात

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची मोठी कारवाई

दुबईत लपलेला ड्रग्ज किंगपिन वीरेंद्र सिंग बसोया भारताच्या ताब्यात

भारताच्या अमली पदार्थविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. परदेशात फरार असलेला कथित ड्रग्ज किंगपिन वीरेंद्र सिंह बसोया याला संयुक्त अरब अमिरातीमधून (युएई) भारतात आणण्यात आले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि संबंधित भारतीय यंत्रणांच्या प्रयत्नांमुळे ही कारवाई करण्यात आली. बसोयावर कोट्यवधी रुपयांच्या कोकेन तस्करीच्या सिंडिकेटचे नेतृत्व केल्याचा आरोप आहे.

बसोयाला युएईमधून भारतात परत आणणे हे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीविरोधातील कारवाईतील महत्त्वाचे यश मानले जात आहे. त्याच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित प्रकरणे आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपासानुसार, बसोया हा आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या ड्रग्ज नेटवर्कशी संबंधित असल्याचा आरोप आहे. या नेटवर्कमार्फत मोठ्या प्रमाणात कोकेनची तस्करी केली जात असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. भारताबाहेर राहून या नेटवर्कचे संचालन केले जात असल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला होता.

अमली पदार्थ तस्करीच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कवर कारवाई करण्यासाठी भारतीय यंत्रणा परदेशातील तपास संस्थांसोबत सातत्याने समन्वय साधत आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकृत माहितीनुसार, अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कविरोधात अनेक मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या कारवाईचे स्वागत करत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. परदेशात लपलेल्या अमली पदार्थ तस्करांना भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारच्या धोरणाचा हा महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोदी सरकारच्या काळात अमली पदार्थ तस्करीविरोधातील कारवाईला आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार देण्यात आला असून, परदेशात फरार असलेल्या ड्रग्ज तस्करांवर कारवाई करण्यासाठी विविध देशांच्या यंत्रणांशी समन्वय वाढवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

टॅरिफ चुकवण्यासाठी चीनकडून भारताचा वापर? ४० देशांवर अमेरिकेचा आरोप

‘टिप द्या, राइड मिळवा’चा फंडा बंद; केंद्राचा उबर-ओलासह सर्व ऍप्सना आदेश

उत्तराखंडच्या चमोलीत जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दुर्घटना; ७ कामगारांचा मृत्यू

एअर इंडियाच्या सर्व वैमानिकांसाठी डोप टेस्ट अनिवार्य

यापूर्वीही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून परदेशात लपलेल्या अमली पदार्थ तस्करांना भारतात आणले आहे. एप्रिल २०२६ मध्ये कुख्यात ड्रग्ज तस्कर मोहम्मद सलीम डोला याला तुर्कीमधून भारतात आणण्यात आले होते. त्याच्याविरोधात भारतात अनेक अमली पदार्थ तस्करीची प्रकरणे दाखल होती.

Exit mobile version