सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) लखनऊ विभागीय युनिटने गुरुवारी कथित धर्मांतर रॅकेटप्रकरणी स्वयंघोषित धर्मगुरू जमालुद्दीन शाह उर्फ छंगूर बाबाशी संबंधित १४ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील १२ ठिकाणांचा आणि मुंबईतील दोन ठिकाणांचा समावेश आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ५ वाजता हे छापे टाकण्यात आले. बलरामपूर जिल्ह्यातील उतरौला, मधुपूर गाव, रेहरामाफी गाव आणि इतर अनेक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. मुंबईतील दोन ठिकाणे, वांद्रे आणि माहीम, ही शहजाद शेख नावाच्या व्यक्तीशी संबंधित आहेत. वांद्रे येथील निवासस्थानी उपस्थित असलेल्या शेखची ईडीकडून चौकशी सुरू आहे.
तपासादरम्यान, अधिकाऱ्यांना शहजाद शेखच्या बँक खात्यात २ कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार आढळून आले. हे पैसे छंगूर बाबाचा एक ज्ञात साथीदार आणि सध्याच्या धर्मांतर प्रकरणात आरोपी असलेल्या नवीन रोहरा उर्फ जमालुद्दीन याच्या खात्यातून हस्तांतरित झाल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदी १८ जुलैला बिहार, पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर
छत्तीसगडची रंजीता सुवर्ण विजेती
सत्यजित रे यांचे मूळ घर सुरक्षित, तोडफोड झालेली नाही
अंदमान समुद्रात अनेक तेल क्षेत्रे सापडण्याची अपेक्षा
प्राथमिक निष्कर्षांनुसार, हे पैसे मालमत्ता खरेदीसाठी होते आणि त्यापैकी काही रक्कम नंतर अनेक इतर खात्यांमध्ये वळवण्यात आली. ईडी सध्या पैशांच्या स्त्रोताचा, त्यांच्या उद्देशाचा आणि या प्रकरणात सामील असलेल्या व्यक्तींच्या नेटवर्कचा शोध घेत आहे. अधिकाऱ्यांना संशय आहे की हे व्यवहार जबरदस्तीने केलेल्या धर्मांतराच्या आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांच्या मोठ्या कटाचा भाग असू शकतात. पुढील तपासणीसाठी डिजिटल उपकरणे, मालमत्ता-संबंधित कागदपत्रे आणि बँकिंग नोंदी जप्त करण्यात आल्या आहेत.
उत्तर प्रदेशातील १२ ठिकाणी टाकलेल्या छाप्यात ईडीला मोठ्या प्रमाणात जमिनीशी संबंधित कागदपत्रे, बेहिशेबी रोकड आणि कथित धर्मांतर नेटवर्कशी संबंधित महत्त्वपूर्ण डिजिटल पुरावे सापडले आहेत. ईडीकडून छंगूर बाबाचे जवळचे सहकारी, अनुयायी आणि आश्रम व्यवस्थापक यांच्यावरही लक्ष केंद्रित करत आहे, त्यांच्या बँक खात्यांची, मालमत्तांची आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करत आहे. दुबई, सौदी अरेबिया आणि नेपाळमधून निधी आल्याचे प्राथमिक निष्कर्षांनी सूचित केले असून, कथित धर्मांतर ऑपरेशन्सच्या सीमापार वित्ताबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
