खंडणीखोर ‘गिन्नी’ला अटक, पोलिसांनी काढली धिंड!

मुलुंड न्यायालयात करणार हजर

खंडणीखोर ‘गिन्नी’ला अटक, पोलिसांनी काढली धिंड!

मुलुंड परिसरात दहशत निर्माण करून खंडणी उकळणारा आणि तडीपार असतानाही गुन्हेगारी कृत्ये करणारा कुख्यात गुंड बलबीरसिंग बलदेवसिंग लांबा उर्फ गिन्नी याला अखेर मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर पोलिसांनी त्याची चालत धिंड काढून परिसरात असलेली दहशत कमी करण्याचा प्रयत्न केला.

काय आहे प्रकरण?

बलबीरसिंग उर्फ गिन्नी हा मुलुंड कॉलनी येथे राहतो आणि त्याची या परिसरात प्रचंड दहशत आहे. स्थानिक फेरीवाले, व्यावसायिक यांच्याकडून खंडणी उकळणे, त्यांच्यावर हल्ले करणे असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल आहेत. अनेक वेळा तडीपार होऊनही तो मुलुंडमध्ये येऊन खंडण्या उकळत होता. त्याच्या दहशतीमुळे नागरिक त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यास धजावत नव्हते. मागील आठवड्यात गिन्नीविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल झाले.

पहिला गुन्हा: शिवसेना (शिंदे गट) युवा सेनाचे स्थानिक अध्यक्ष गुरुज्योत सिंग किर यांनी दाखल केला. गिन्नीने त्यांच्या वाहनांची तोडफोड करून “माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, मी स्वतः अनेक वेळा तडीपार झालो आहे,” अशी धमकी देत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

दुसरा गुन्हा (२६ ऑक्टोबर): एका व्यावसायिकाने दाखल केला. त्याला व्यवसाय करायचा असल्यास महिन्याला १० हजार रुपये खंडणी द्यावी लागेल अशी धमकी देऊन गिन्नीने त्यांना रिव्हॉल्व्हर दाखवले होते.

पत्नीची सुटका आणि धिंड

बुधवारी सकाळी मुलुंड पोलिसांना कंट्रोल रूममधून एका महिलेचा ‘१००’ क्रमांकावर कॉल आला. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी बलबीरसिंग उर्फ गिन्नीच्या तावडीतून एका महिलेची सुटका केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुटका केलेली महिला ही गिन्नीची पत्नी असून तो तिला विवस्त्र करून मारहाण करत असल्यामुळे तिने मदतीसाठी पोलिसांना कॉल केला होता. पोलिसांनी गिन्नीला ताब्यात घेतले आणि त्याची लोकांमधील दहशत कमी करण्यासाठी पोलीस ठाण्यापर्यंत पायीच धिंड काढली. लोकांनी याचे व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

हे ही वाचा : 

टॅरिफ वॉर दरम्यान ट्रम्प- जिनपिंग भेट; काय झाली चर्चा?

महाराष्ट्र बनणार ‘रिइमॅजिनिंग मॅन्युफॅक्चरिंग’चा नवा चेहरा!

सागरी मंथनामुळे लाभणार विकास ‘अमृत’

सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी दोन अब्ज डॉलर्सचे करार

अटक आणि पुढील कारवाई

मुलुंड पोलिसांनी सायंकाळी गिन्नीला नुकत्याच दाखल झालेल्या खंडणी आणि धमकीच्या गुन्ह्यात औपचारिकरित्या अटक केली आहे. गुरुवारी त्याला मुलुंड न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मुलुंड पोलिसांच्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Exit mobile version