मुंबईतील शिवाजी पार्क पोलिसांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला एक मोठी कारवाई करत बनावट नोटांची तस्करी करणाऱ्या एका ६१ वर्षीय इसमाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून ५०० रुपयांच्या एकूण ७२ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.
नेमकी घटना काय?
३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:०५ वाजेच्या सुमारास शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि मंगेश जमदाडे आणि त्यांचे पथक दादर परिसरात गस्त घालत होते. यावेळी डिसिल्वा गल्लीतील शगुण हॉटेलजवळ एक इसम संशयास्पद स्थितीत फिरताना पोलिसांना दिसून आला. संशय बळावल्याने पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत त्याची अंगझडती घेतली.
या झडतीदरम्यान, आरोपीने आपल्या अंडरवेअरमध्ये शिवलेल्या एका चोरखिशात ५०० रुपये दराच्या १४४ बनावट चलनी नोटा लपवून ठेवल्याचे उघड झाले. पोलिसांनी तातडीने ७२ हजार रुपये किमतीच्या या बनावट नोटा जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले.
अट्टल गुन्हेगार अटकेत
अमरउद्दीन अलीहुसेन शेख (वय ६१, रा. झारखंड, सध्या रा. भायखळा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस तपासात समोर आले आहे की, अमरउद्दीन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अंधेरी, डी.बी. मार्ग, नेरुळ, भोईवाडा आणि अंबरनाथ यांसारख्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, चोरी आणि प्राणघातक हल्ल्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
शिवाजी पार्क पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या नोटा त्याने कोठून आणल्या आणि तो त्या कोणाला विकणार होता, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा :
स्वित्झर्लंडमधील बारला आग; डझनावारी लोकांचा मृत्यू
केकेआरच्या मुस्तफिजूर निवडीवर वाद
फिटनेसवर प्रश्नचिन्ह, पण विश्वास कायम; टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज
