शेतकऱ्याने किडनी विकली; आरोपींवर मकोका लावण्याची मागणी

आमदार अतुल भातखळकरांनी विधिमंडळात व्यक्त केला संताप

शेतकऱ्याने किडनी विकली; आरोपींवर मकोका लावण्याची मागणी

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून या दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी किडनी विकण्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. लक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमातून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी यावरून राज्य सरकारला प्रश्न विचारत आरोपींवर ‘मकोका’ लावण्याची मागणी केली. त्याचबरोबर शेतकऱ्याची किडनी विकण्याच्या प्रकरणात विशेष न्यायालयात फास्टट्रॅक खटला सुरू करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, चंदपूरमधील एका शेतकऱ्याने सावकाराकडून घेतलेले कर्ज मुद्दल आणि व्याजासह फेडले तरीही त्याच्यावर किडनी विकण्याची वेळ आली. संबंधित शेतकऱ्यासह अन्य काहींना परदेशी पाठवून किडनी विकायला लावली. यातून सावकारी कर्जातून लोकांच्या फसवणुकीचे आणि छळ होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. माणुसकीला काळिमा फासणारे आणि सुसंकृत महाराष्ट्राची मान खाली घालण्याचे हे प्रकरण असल्याचे अतुल भातखळकर म्हणाले.

राज्य सरकारने या प्रकरणी कारवाई केली. एक समिती आणि एसआयटी नेमून अन्य राज्यातील या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, या प्रकरणातील काही आरोपींना जामीन मिळाला आहे. सावकारी नियमांच्या उल्लंघनासाठी गुन्हा दाखल असून आरोपींवर लावण्यात आलेली कलमे अत्यंत तकलादू आहेत. हे संघटित गुन्हेगारीचे प्रकरण असल्यामुळे या आरोपींवर ‘मकोका’च लावायला हवा. त्यामुळे सरकार आरोपींवर ‘मकोका’ लावणार का असा प्रश्न अतुल भातखळकर यांनी सभागृहात विचारला. तसेच विशेष न्यायालयात फास्टट्रॅक खटला सुरू करून प्रकरणाचा निकाल लावणार का असा दुसरा प्रश्न आमदार भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. सावकारी कर्जाच्या वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी समिती अथवा भरारी पथके निर्माण करणार का असा सवालही अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी या लक्ष्यवेधीवर उत्तर देताना म्हटले की, संबंधित घटना २०२१ ते २०२३ मधली असून शेतकऱ्याने सहा जणांकडून कर्ज घेतले होते. पुढे शेतकऱ्याला कर्जवसुलीसाठी त्रास देण्यात आल्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार केली आणि २०२५ मध्ये प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी तातडीने सहा जणांना अटक केली. मात्र, दरम्यान कर्जवसुलीसाठी शेतकऱ्याच्या मागे तगादा लावल्याने त्याने स्वतःची किडनी विकून कर्ज परतफेड केले.

हे ही वाचा:

खाण विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या घरात सापडली ‘पैशाची खाण’

झारखंडमधील अपघातग्रस्त एअर ऍम्ब्युलन्समध्ये ब्लॅक बॉक्स नव्हता! कसा होणार तपास?

उंदरांपासून सुरक्षित राखण्यासाठी तो लावत होता, फळांना उंदरांचे विष…बसला चोप

5G स्पेक्ट्रम लिलावापूर्वी मोठा निर्णय; किमतीत ७% ते ३७% कपात

पुढे पंकज भोयर म्हणाले की, पोलिसांनी सखोल चौकशी केली असता लक्षात आले की, सोलापूरमधील एक इसमाने फेसबुकवर दोन अकाऊंट तयार केले- आधी किडनी डोनर आणि नंतर किडनी रिसिव्हर. यानंतर शेतकरी याच्या संपर्कात आला आणि सोलापूरचा इसम त्याला कंबोडियाला घेऊन गेला. शेतकऱ्याची किडनी विकून त्याला पैसे देण्यात आले. शेतकऱ्याने सहा लोकांचे कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही सावकारांनी तगादा लावला. पुढे सहा जणांना अटक करण्यात आली. शिवाय सोलापूरच्या व्यक्तीसहित आणखी एकाला अशा आठ जणांना अटक झाली.

केवळ कंबोडिया येथे असे प्रकार सुरू नसून भारतात तामिळनाडूमधील एका रुग्णालयात देखील असा प्रकार होत असल्याचे उघडकीस आल्याचे पंकज भोयर म्हणाले. या प्रकरणी रुग्णालयाचा मालक आणि रुग्णालयात दिल्लीहून येणारा डॉक्टर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, दोन्ही आरोपी फरार असून शोध सुरू आहे, अशी माहिती पंकज भोयर यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील सहा आरोपींची मालमत्ता गोठवण्याचे निर्देश दिले आहेत. सावकारी कर्जावर लक्ष ठेवण्यासाठी समिती असल्याचे पंकज भोयर म्हणाले.

Exit mobile version