मुंबईच्या मालवणी परिसरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेत किमान ७ जण भाजले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे ९.२५ वाजता मालवणी परिसरातील भारत माता शाळेजवळील एका चाळीत सिलेंडरचा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाला कळवण्यात आले. त्यानंतर मुंबई अग्निशमन दलासह स्थानिक पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक तपासात गॅस सिलेंडरमधील गळतीमुळे स्फोट होऊन आग लागल्याचे समोर आले असून, त्यात ७ जण जखमी झाले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा देत सांगितले की, स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या पुढील कारवाई सुरू आहे. दरम्यान, कोलकात्याच्या नाझिराबाद भागातील एका गोदामाला लागलेल्या आगीत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत, अशी माहिती पश्चिम बंगाल पोलिसांनी मंगळवारी दिली.
हे ही वाचा:
विजय मिरवणूक; ठाकरे गटाचे नगरसेवक मिलिंद वैद्यांसह ४० जणांवर गुन्हा
भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारात सोने, चांदी चमकली!
‘धुरंधर’ चित्रपटात भूमिका साकारणारा नदीम खान बलात्कार प्रकरणी अटकेत
कर्तव्य पथावर पंतप्रधान मोदी सर्वसामान्यांना भेटले; राजशिष्टाचार ठेवला बाजुला
मंगळवारी सकाळी पश्चिम बंगाल अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाचे महासंचालक रणवीर कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, गोदामात अनेक नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते आणि अग्निसुरक्षा मंजुरी (फायर क्लिअरन्स)ही नव्हती. “आम्ही आवश्यक ती पुढील प्रक्रिया राबवू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही आग सोमवारी पहाटे सुमारे ३ वाजता सुक्या अन्नधान्याच्या गोदामात लागली. या गोदामात प्रामुख्याने सुक्या व पॅकबंद अन्नपदार्थांसह सॉफ्ट ड्रिंक्सच्या बाटल्या साठवण्यात आल्या होत्या. अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, आग शेजारील दोन गोदामांपर्यंतही पसरली असून जवळपास सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. गोदाम अरुंद गल्लीमध्ये असल्याने आग विझवताना अग्निशमन कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
