दिल्ली पोलिसातील महिला कमांडोला हुंड्यासाठी पतीने केले ठार!

मुलीच्या आईवडिलांनी प्रचंड हुंडा देऊनही हाव भागली नाही

दिल्ली पोलिसातील महिला कमांडोला हुंड्यासाठी पतीने केले ठार!

पोलिस खात्यातील विशेष शस्त्र आणि तंत्र या विभागात (स्वॅट SWAT) काम करणाऱ्या एक महिला कमांडो काजल हिला हुंड्याच्या हव्यासाचा बळी ठऱावे लागल्याची दुर्दैवी आणि संतापजनक घटना दिल्लीत घडली आहे. तिचा पती अंकूरने तिचा खून केला. मृत्यूपूर्वी काही मिनिटे आलेला एक अंगावर काटा आणणारा फोन कॉल दिल्ली पोलिसांच्या स्वॅट कमांडो काजलच्या हत्येतील अत्यंत महत्त्वाचा धागा ठरला आहे. चार महिन्यांची गर्भवती असलेल्या काजलचा हुंड्याच्या मागणीवरून पती अंकूरने अमानुष मारहाण करून खून केल्याचा आरोप आहे.

२२ जानेवारीच्या त्या काळरात्रीची आठवण सांगताना काजलचा भाऊ निखिल म्हणाला की, त्याला त्याचा मेहुणा अंकूर याचा फोन आला होता. संरक्षण मंत्रालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेला आणि दिल्ली कॅन्टोन्मेंट येथे तैनात असलेल्या अंकूरने फोनवर निखिलला थेट त्याच्या बहिणीला मारण्याची धमकी दिली होती.

“त्याने मला फोन करून सांगितले, ‘हा कॉल रेकॉर्डिंगवर ठेव, पोलिसांच्या पुराव्यात कामाला येईल. मी तुझ्या बहिणीला मारतोय. पोलीस माझं काहीही करू शकणार नाहीत,’” असे निखिलने सांगितले. निखिलच्या म्हणण्यानुसार, सुमारे पाच मिनिटांनंतर पुन्हा एक फोन आला. यावेळी फोनच्या पार्श्वभूमीवर काजलच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. त्यानंतर अंकूर म्हणाला, “ती मेली आहे. हॉस्पिटलला ये.”

हे ही वाचा:

कॅनडामधून अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या विमानांवर ५० टक्के कर आकारणार

दादरमध्ये इमारतीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या

परदेशी महिलेकडून टॅक्सी चालकाने ४०० मीटरसाठी उकळले १८ हजार

उत्तराखंड: महिलेला लिफ्ट देऊन चालत्या गाडीत बलात्कार; दोघांना अटक

निखिल हा संसद मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला कॉन्स्टेबल आहे. काजलचे कुटुंबीय पोलिसांसोबत मोहन गार्डन येथील दाम्पत्याच्या घरी पोहोचेपर्यंत काजलला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, २७ वर्षीय काजल, जी स्पेशल सेलच्या SWAT पथकात कमांडो म्हणून कार्यरत होती, हिच्यावर २२ जानेवारी रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घरगुती वादातून अमानुष हल्ला करण्यात आला. पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अंकूरने काजलचे डोके जोरात दरवाजाच्या चौकटीवर आपटले आणि त्यानंतर डम्बेलने तिच्यावर हल्ला केला.

घरात करण्यात आलेल्या फॉरेन्सिक तपासणीत दरवाजाच्या चौकटीवर तसेच हल्ल्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय असलेल्या डम्बेलवर रक्ताचे डाग आढळून आले. हल्ल्यानंतर काजलला प्रथम मोहन गार्डन येथील तारक रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर गाझियाबादमधील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान २७ जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला.

सततची हुंड्याची मागणी

काजलच्या पालकांनी आरोप केला आहे की, तिची हत्या ही दीर्घकाळ चाललेल्या हुंडा छळाचा परिणाम आहे. काजलच्या आईने सांगितले की, दोघांचे कॉलेजपासून प्रेमसंबंध होते आणि त्यानंतर त्यांनी प्रेमविवाह केला. लग्नात कुटुंबाने आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च केला होता.

“आम्ही पोलिसांसोबत रुग्णालयात पोहोचलो तेव्हा माझी मुलगी दाखल होती आणि तो आधीच तिचे सर्व दागिने घेऊन गेला होता. तो नेहमी धमकी द्यायचा की पोलीस त्याचं काहीही करू शकत नाहीत,” असे काजलच्या आईने सांगितले.

तिने पुढे आरोप केला की, लाखो रुपयांच्या महागड्या भेटवस्तू देऊनही अंकूरची मागणी थांबत नव्हती. “त्याला कार हवी होती. माझ्या मुलीने स्वतःच्या पैशांतून त्याला कार घेऊन दिली. लग्नात आम्ही सुमारे २० लाख रुपये खर्च केले. याआधीही त्याने तिच्याकडून ५ लाख रुपये घेतले होते. तरीही त्याचे समाधान झाले नाही,” असे ती म्हणाली.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी अंकूरविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

Exit mobile version