कर्नाटक सरकारने मंगळवार, २० जानेवारी रोजी डीजीपी दर्जाचे वरिष्ठ अधिकारी रामचंद्र राव यांचे कार्यालयातील अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तथापि, राव यांनी हे व्हिडिओ पूर्णपणे बनावट आणि मॉर्फ केलेले असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा कट रचला असल्याचे म्हटले आहे आणि व्हिडिओंची सत्यता सिद्ध करण्यासाठी फॉरेन्सिक तपासणीची मागणी केली आहे.
महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत असलेल्या एका व्हिडिओनंतर राव यांना निलंबित करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राव कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांना भेटण्यासाठी गेले होते, परंतु ती बैठक अयशस्वी झाली. सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ज्यात असा दावा केला जात आहे की, आक्षेपार्ह स्थितीत दिसणारे अधिकारी राव आहे. ते सोने तस्करी प्रकरणातील आरोपी राण्या रावचे वडील आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये एक अधिकारी अनेक महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत खुर्चीवर बसलेले दिसतात.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि संपूर्ण घटनेचा सविस्तर अहवाल मागवला. माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा व्हिडिओ कोणत्या परिस्थितीत रेकॉर्ड करण्यात आला आणि तो कोणी प्रसारित केला याची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, व्हिडिओचा स्रोत आणि सत्यता निश्चित करण्यासाठी प्राथमिक चौकशी सुरू केली जाण्याची शक्यता आहे. हे फुटेज डिजिटल पद्धतीने हाताळले गेले आहे का हे निश्चित करण्यासाठी सायबर गुन्हे तज्ञांचाही सहभाग असेल. या घटनेवर राजकीय वर्तुळातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
हे ही वाचा:
ट्रम्प यांच्या भीतीमुळेच कॅनडाची चीनसोबत लोळण फुगडी….
IMF कडून भारतासाठी दिलासादायक अंदाज
५०० रुपयांचा तिकीट… आणि थेट १० कोटींची लॉटरी!
तथापि, राव यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत, त्यांनी व्हिडिओला “बनावट आणि खोटा” म्हटले आहे. “मी आठ वर्षांपूर्वी बेळगावमध्ये होतो, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आम्ही आमच्या वकिलाशी याबद्दल बोललो आहोत आणि आम्ही कारवाई करत आहोत. हे आमच्यासाठी धक्कादायक आहे. ते बनावट आणि खोटे आहे. तो व्हिडिओ पूर्णपणे खोटा आहे. मला माहित नाही की काही घडले आहे की नाही; चौकशीशिवाय ते उघडकीस येणार नाही. याची चौकशी झाली पाहिजे. अशी खोटी माहिती पसरवली जात आहे,” असे राव म्हणाले.
