गोवंडी येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) प्रकल्पात घर पाडल्यानंतर बसलेल्या धक्क्याने एका ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी बिल्डरसह पुनर्विकास समितीच्या चार सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या परीक्षेसाठी वेळ मागूनही घर पाडल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.
अनिल पगारे (६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते आपली पत्नी कविता आणि २२ वर्षीय मुलीसह गोवंडीतील लिबोनी बाग परिसरात राहत होते. याप्रकरणी पोलिसांनी बिल्डर सदानंद शेट्टी, पुनर्विकास समितीचे सदस्य अरुण कांबळे, विजय कसबे, रतन निरभवणे आणि आशा निरभवणे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
लिबोनी बाग परिसरातील एसआरए पुनर्विकास प्रकल्पात सुमारे ३५० घरांचा समावेश आहे. यापैकी २७० घरे यापूर्वीच पाडण्यात आली आहेत. पगारे यांच्या मुलीची सध्या परीक्षा सुरू असल्याने, घराचे सामान हलवण्यासाठी त्यांनी ४ मार्च रोजी एसआरए कार्यालयात जाऊन काही दिवसांची मुदत मागितली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी (५ मार्च) समितीचे सदस्य आणि बिल्डरचे प्रतिनिधी घर पाडण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.
हे ही वाचा:
बहरीनमध्ये पाच पाकिस्तानींसह बांगलादेशीला अटक!
टी२० विश्वचषक विजयामागचा ‘मास्टरमाइंड’!
‘समान नागरी संहितेतून मुस्लिम महिलांना संपत्तीत वाटा!’
विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांचा पाऊस!
“मुलीच्या परीक्षेसाठी थोडा वेळ द्या, अशी विनंती कुटुंब करत होते. मात्र, त्यांचे काहीही न ऐकता घर पाडण्याचे काम सुरू करण्यात आले,” अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. आपले हक्काचे घर डोळ्यादेखत जमीनदोस्त होताना पाहून अनिल पगारे यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आणि ते जागीच बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कायदेशीर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
पगारे कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, घर पाडण्यापूर्वी त्यांना पुनर्विकास योजनेशी संबंधित कोणतीही अधिकृत कागदपत्रे देण्यात आली नव्हती. योग्य प्रक्रियेचा अवलंब न करताच जबरदस्तीने कारवाई करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आणि त्यातच अनिल यांचा जीव गेल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (फसवणूक), ३५१ (गुन्हेगारी धमकी) आणि ६१ (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
