बँकॉकहून आणलेले १२.६८ कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबई विमानतळावर केरळच्या तरुणाला बेडया

बँकॉकहून आणलेले १२.६८ कोटींचे ड्रग्ज जप्त

थायलंडची राजधानी बँकॉक येथून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने (कस्टम्स) उधळून लावला आहे. रविवारी केलेल्या या कारवाईत १२.६८ कोटी रुपये किमतीचे ‘हायड्रोपोनिक वीड’ (गांजा) जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी केरळमधील एका २८ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

संशयावरून तपासणी आणि पर्दाफाश

मिळालेल्या माहितीनुसार, नौशाद ओलापुलन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नौशाद हा रविवारी बँकॉकहून मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला होता. ‘स्पॉट प्रोफाइलिंग’च्या आधारे कस्टम्सच्या अधिकाऱ्यांना त्याच्या हालचालींवर संशय आला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्या सामानाची झडती घेतली असता, सुरुवातीला बॅगेत फक्त कपडे असल्याचे भासले. मात्र, कपड्यांच्या थराखाली लपवलेली १२ पाकिटे आढळली. या पाकिटांची तपासणी केली असता त्यात हिरव्या रंगाचा कोरडा पाला आढळला, जो उच्च दर्जाचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ असल्याचे निष्पन्न झाले.

कस्टम्सने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या या अमली पदार्थाचे एकूण वजन १२ किलो ६८८ ग्रॅम असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत १२.६८ कोटी रुपये इतकी आहे. आरोपीने हा माल गुपचूप आणल्याची आणि तो लपवून ठेवल्याची कबुली दिली आहे. एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने कबूल केले आहे की, या तस्करीसाठी त्याला मोठी रक्कम मिळणार होती. या प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यावर असून बँकॉकचा पुरवठादार आणि मुंबईतील त्याचे हस्तक यांचा शोध घेतला जात आहे.”

हे ही वाचा:

गोवंडीत गॅस वितरण कर्मचारी विकत होता चढ्या दराने सिलिंडर

बीसीसीआय ‘नमन’ अवॉर्ड्समध्ये द्रविड, बिन्नी यांचा सन्मान

सचिनचे ऐतिहासिक १००वा शतक!

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या डीजीपी आणि मुख्य सचिवांना हटवले

थायलंडच्या धोरण बदलाचा तस्करांना फायदा?

महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) अलीकडेच आपल्या अहवालात नमूद केले आहे की, थायलंडमध्ये गांजाच्या लागवडीबाबत आणि विक्रीबाबत नियम शिथिल झाल्यामुळे तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बँकॉकहून भारतात येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून व्हॅक्यूम-सीलबंद पॅकेटमध्ये अमली पदार्थ लपवून आणण्याची ही एक नवीन ‘मोडस ऑपरेंडी’ तस्करांकडून वापरली जात आहे.

Exit mobile version