आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; मुंबईतील मोबाईल चोरीचे धागे बांगलादेशात!

३० लाखांचे १८६ मोबाईल जप्त; ८ आरोपींना अटक

आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; मुंबईतील मोबाईल चोरीचे धागे बांगलादेशात!

मुंबईत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मोबाईल चोरीमागे आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत असल्याचा मोठा खुलासा मुंबईच्या चुनाभट्टी पोलिसांनी केला आहे. नवी मुंबई, चुनाभट्टी आणि कोलकाता येथे केलेल्या कारवाईत पोलिसांनी या टोळीतील आठ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ३० लाख ४८ हजार रुपये किमतीचे १८६ चोरीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या रॅकेटचे थेट बांगलादेश कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

या टोळीकडून चोरीचे मोबाईल फोन कुरिअरमार्फत कोलकाता येथून बांगलादेशात तस्करी केले जात होते. भारतात मोबाईल ट्रेसिंगसाठी उपलब्ध असलेल्या प्रभावी सॉफ्टवेअर आणि पोर्टलमुळे चोरीच्या फोन्सची विक्री देशांतर्गत करणे आता कठीण झाले आहे. त्यामुळेच, भारतात चोरीला गेलेले फोन आता नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेशसारख्या शेजारील देशांमध्ये पाठवणारी एक संघटित आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय झाली आहे. या टोळीचे जाळे भारतातील प्रत्येक राज्य आणि शहरात पसरले आहे.

हे ही वाचा:

बरेलीमध्ये मौलाना मोहसीन रझा यांच्या मालमत्तेवर बुलडोझर कारवाई!

विद्यार्थ्यांनी रचली जनरल- झेड शैली प्रमाणे निषेध करण्याची योजना; प्रकरण काय?

दिवाळीपूर्वी बळीराजाला नुकसानभरपाई मिळणार!

बोगस ‘आयएएस’ची दीडशे जणांना कोट्यवधींची ‘टोपी’!

टोळीत कोण-कोण सामील?

चुनाभट्टी पोलिसांनी नुकत्याच अटक केलेल्या या आठ जणांच्या टोळीत मोबाईल चोरणारे, चोरीचे फोन विकत घेणारे, मोबाईल दुरुस्ती करणारे (टेक्निशियन) आणि भारतातून परदेशात फोनची तस्करी करणारे तसेच कुरिअर कंपन्यांशी संबंधित लोकही सामील आहेत.

मुंबई आणि नवी मुंबई येथून सचिन लक्ष्मण गायकवाड, तौसिफ आयुब सिद्दीकी, अमर गौरीलाल शंकर, निसार असिक हुसेन आलम, सादिक अली मैनुद्दिन शेख, मुर्शीद मन्सूर सिद्दीकी यांना अटक करण्यात आली आहे. तर प्रदीप विश्वनाथ गुप्ता आणि अझिझुर अनिसुर रेहमान यांना कोलकाता येथून अटक करण्यात आली आहे.

बांगलादेशी नागरिकांचा सहभाग

अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून या आंतरराष्ट्रीय रॅकेटचे बांगलादेश कनेक्शन समोर आले आहे. मुंबईत चोरीचे मोबाईल खरेदी करून ते बांगलादेशात पाठवणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांची नावे पोलिसांना मिळाली असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल चोरी करण्यापासून ते त्यांचे आयएमईआय क्रमांक काढणे, ते कोलकाता येथे कुरिअर करणे आणि तिथून बांगलादेश सीमेपलीकडे पोहोचवण्यापर्यंतचे काम या रॅकेटमधील प्रत्येक सदस्य करत होता. चौकशीत असे समोर आले आहे की, बांगलादेशातील मोबाईल फोन मार्केटमधून येणाऱ्या मागणीनुसार मुंबईतून चोरीच्या मोबाईल फोनचा पुरवठा केला जात होता.

Exit mobile version