शहरात खासगी वाहनांवर बेकायदेशीररीत्या लावण्यात येणाऱ्या ‘डोम लाईट’ (फ्लॅशिंग दिवे) आणि सायरन विरोधात मुंबई वाहतूक पोलीसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसांत शहरभर राबवलेल्या विशेष मोहिमेत ८० वाहनांवर कारवाई करण्यात आली असून अनेक डोम लाईट्स आणि सायरन जप्त करण्यात आले.
हे ही वाचा:
मुंबईसह राज्याला अवकाळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
भारत डिजिटल व्यवहारांत आघाडीवर; मार्चमध्ये UPI व्यवहारांचा विक्रमी उच्चांक
झारखंडमध्ये ‘टायगर’चे आत्मसमर्पण!
गुढीपाडव्यात १८ दिवसांत १०००हून अधिक प्रकल्पांना मंजुरी
वाहनचालकांकडून व्हीआयपी असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी तसेच वाहतुकीतून बेकायदेशीर मार्ग काढण्यासाठी अशा दिव्यांचा वापर वाढल्याच्या तक्रारी पोलिसांना वारंवार प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर १ व २ एप्रिल रोजी संपूर्ण मुंबईत विशेष मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेत दक्षिण, मध्य, पूर्व, पश्चिम तसेच उपनगरांतील विविध वाहतूक विभागांनी संयुक्त कारवाई करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची तपासणी केली. यामध्ये ८० वाहनांवरील विविध रंगांचे बेकायदेशीर डोम लाईट्स आणि तीन सायरन जप्त करण्यात आले. संबंधित वाहनचालक आणि मालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पुढेही अशा प्रकारचे डोम लाईट किंवा सायरन आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. गंभीर प्रकरणांमध्ये वाहनांची नोंदणी (आरटीओ) रद्द करण्याची शिफारस करण्यात येईल तसेच गुन्हा दाखल करण्याची शक्यता नाकारलेली नाही.
दरम्यान, नागरिकांनीही अशा बेकायदेशीर प्रकारांविषयी माहिती फोटोसह पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर किंवा हेल्पलाईनवर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
